Nyra Banerjee recalls meeting Salman Khan : ‘दिव्य दृष्टि’, ‘पिशाचिनी’ आणि ‘बिग बॉस १८’ सारख्या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नायरा बॅनर्जी हिने बॉलीवूडचा सुप्रसिद्ध सुपरस्टार सलमान खान याच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा अंगावर काटा आणणारा किस्सा शेअर केला आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत असताना शेजारीच ‘दबंग’चे शूटिंग सुरू होते. प्रियदर्शन यांच्या सांगण्यावरून सलमान खान थेट कोणतीही सुरक्षा न घेता सेटवर आले. पण सलमानला समोरून चालत येताना पाहून नायरा इतकी घाबरली की ती थरथर कापू लागली आणि उलट्या दिशेने माघारी फिरली.

‘दबंग’च्या शूटिंगदरम्यान सलमानला भेटली होती नायरा

नायरा बॅनर्जीने एका मुलाखतीत सांगितलं की, ती दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि त्याच वेळी सलमान खानसुद्धा तिथे त्याच्या ‘दबंग’ चित्रपटाचं शूटिंग करत होता. ही गोष्ट नायराला समजल्यावर तिने प्रियदर्शन यांच्या मदतीने सलमानला भेटायचं ठरवलं. त्यानंतर सलमान स्वतः नायरा आणि प्रियदर्शन यांच्या चित्रपटाच्या सेटवर आला होता.

नायरा ‘बिग बॉस १८’ मध्ये स्पर्धक म्हणून गेली होती. पण त्यापूर्वीच सलमानशी भेटल्याचं तिने सांगितलं. “जेव्हा मी प्रियदर्शन सरांच्या चित्रपटाचं शूटिंग करत होते, तेव्हा आमच्या समोरच सलमान त्यांच्या ‘दबंग’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. मी प्रियदर्शन सरांना विनंती केली की मला त्यांना भेटायचंय. त्यानंतर प्रियदर्शन यांनी सलमानला सेटवर बोलावलं. सलमान खान सुरक्षा रक्षकांशिवाय थेट सेटवर आमच्या सेटच्या दिशेने आले. त्यांना भेटण्यासाठी मीही थोडी चालत गेले होते,” असं नायरा म्हणाली.

सलमान खानला येताना पाहून घाबरली नायरा

सलमान खानला येताना पाहून नायरा बॅनर्जी चांगलीच घाबरली. “सलमान खान माझ्याकडे येत होते. मी घाबरले आणि थरथर कापू लागले आणि मग उलट्या दिशेने चालू लागले. त्यानंतर माझ्या टीमने मला थांबवलं आणि सांगितलं की प्लीज जाऊन सलमान खानशी बोल,” अशी आठवण नायरा बॅनर्जीने सांगितली.

नायरा बॅनर्जीने ‘दिव्य दृष्टि’, ‘बिग बॉस १८’, ‘खतरों के खिलाडी १३’ व ‘पिशाचिनी’ यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तसेच ‘कमाल धमाल मालामाल’ व ‘वन नाइट स्टँड’ हे तिचे बॉलीवूड चित्रपट आहेत. तिने काही दाक्षिणात्य चित्रपट व वेब सीरिजही केल्या आहेत.