Nana Patekar Leaves O Romeo Trailer Launch : शाहिद कपूर, तृप्ती डिमरी व नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ओ’रोमिओ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. मात्र या कार्यक्रमादरम्यान काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच या कार्यक्रमातून बाहेर पडले. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया…

नाना पाटेकर ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित होते. मात्र, प्रमुख कलाकार उशिरा आल्यामुळे त्यांनी कार्यक्रम अर्धवट सोडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर दुपारी सुमारे १२ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. मात्र, शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी हे दीड तास उशिरा म्हणजे दीड वाजण्याच्या सुमारास आले.

शाहिद आणि तृप्ती हे जवळच्याच एका सिनेमागृहात चित्रपटाच्या पोस्टर लाँच कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे ते ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी उशिरा पोहोचले. जवळपास एक-दीड तास वाट पाहून कंटाळलेल्या नाना पाटेकरांनी ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच कार्यक्रमातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत नाना पाटेकरांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीही स्टेजवरून यावर प्रतिक्रिया दिली.

नाना पाटेकरांबद्दल दिग्दर्शक म्हणाले…

माध्यमांशी बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, “नाना कार्यक्रमातून निघून गेले असले तरी मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. नाना म्हणजे वर्गातला सगळ्यात खोडकर मुलगा, जो थोडासा लोकांना छळतोही आणि सगळ्यांचं मनोरंजनही करतो. मी नानांना गेली २७ वर्षे ओळखतो, पण पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करत आहोत. ते इथे असते, तर खूप छान झालं असतं. पण आम्ही त्यांना जवळपास तासभर वाट पाहायला लावलं. शेवटी वाट पाहून ते निघून गेले. जाताना ते म्हणाले, ‘मला तासभर वाट पाहायला लावलं म्हणून मी चाललो.’ याच गोष्टीमुळे नाना म्हणजे नाना पाटेकर आहेत.”

नाना पाटेकरांबद्दल नेटकरी म्हणाले…

या घटनेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिलं, “खूप चांगला निर्णय आहे. ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला पाहिजे. आपण मुख्य कलाकार आहोत म्हणून काहीही करता येतं, असा समज नसावा. नाना पाटेकरांनी योग्य पाऊल उचललं.”

तर दुसऱ्याने म्हटलं, “नाना पाटेकर अशा पिढीतले आहेत जिथे वेळ आणि शिस्त यांना खूप महत्त्व दिलं जातं. एका ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकाराला दीड तास वाट पाहायला लावणं हा मोठा अपमान आहे. वेळ दिली असेल, तर ती पाळली पाहिजे.”

आणखी एकाने टोला लगावत म्हटलं, “शाहिद नेहमी शिस्तीबद्दल ज्ञान देतो, मग इथे काय झालं?” दरम्यान, काही नेटकऱ्यांनी कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटवरही बोट ठेवलं असून, चुकीच्या नियोजनामुळे ही नामुष्की ओढवल्याचं म्हटलं आहे.