Akshaye Khanna dance old video: सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जिथे अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. फोटो, व्हिडीओ, गाणी, डान्स, चित्रपटाचे ट्रेलर, चित्रपटातील गाजलेल्या सीन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. विशेष म्हणजे आताचेच नाही, तर जुन्या चित्रपटांतील अनेक प्रसंगांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकलेला अक्षय खन्ना
आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अक्षय खन्ना डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ २००० सालचा आहे. एका पुरस्कार सोहळ्यात अक्षय खन्ना शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. छैय्या छैय्या या गाण्यावर तो थिरकताना दिसत आहे. त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री ट्विंकल खन्नादेखील दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षय खन्नाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्याने काळ्या रंगाची टोपीदेखील घातली आहे; तर ट्विंकल खन्नाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. अक्षय आणि ट्विंकल यांच्यातील केमिस्ट्री आणि त्यांच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत.
अक्षय खन्ना, ट्विंकल यांच्याबरोबरच पुढे स्टेजवर आमिर खानदेखील दिसत आहे. तसेच, कलाकार ‘ढोली तारो ढोल बाजे’ या गाण्यावरही ग्रुप डान्स करत असल्याचे दिसत आहेत.
#AkshayeKhanna dancing on #ChaiyyaChaiyya and #BajeDhol#ShahRukhKhan #SalmanKhan pic.twitter.com/oE9c6IxAii
— $@M (@SAMTHEBESTEST_) February 1, 2026
आता या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तो हँडसम दिसत असल्याचे लिहिले आहे; तर अनेकांनी त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे. एकाने लिहिलेय, “तो खूप हँडसम आहे. तो हँडसम असल्याचे त्याला माहीतही नसेल. तो उत्तम डान्सर आहे, असेही एकाने लिहिले आहे. तर एकाने ‘धुरंधर’मधील त्याच्या भूमिकेचा उल्लेख करत लिहिले की, कॉलेजच्या दिवसांमधील रेहमान डकैत. अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
अक्षय खन्ना नुकताच त्याच्या ‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे चर्चेत आला होता. या चित्रपटात त्याने धुरंधर ही भूमिका साकारली आहे. त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका साकारली आहे, त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसले. आनंद, दु:ख, लालसा, धोका, पराभव अशा विविध छटा असलेली भूमिका त्याने साकारली. इतकेच नाही तर चित्रपटातील त्याचा डान्सदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. FA9LA या गाण्यावरील त्याच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेताना दिसल्या. संपूर्ण देशभरातून अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव झाला.
‘धुरंधर’आधी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेचेही खूपच मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.
मग अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’मध्ये भूमिका साकारण्यास नकार दिला आणि या चित्रपटातून तो बाहेर पडला. त्यानंतर ‘दृश्यम’च्या निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्याच्यावर टीका केली होती.
दरम्यान, अक्षय खन्ना लवकरच ‘महाकाली’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो शुक्राचार्य ही भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकने लक्ष वेधून घेतले असून, प्रेक्षक त्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

