मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्या इतकंच किंवा त्याहूनही अधिक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले. यापैकीच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते ओम पुरी. ओम पुरी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्याचं म्हटलं जातं. त्यात त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने केलेल्या खुलाशामुळे ते अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले.
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी सीमा कपूर सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्यांनी ओम पुरी यांच्याशी झालेल्या लग्नाबद्दल आणि विभक्त झाल्यानंतरच्या वेदनादायी प्रसंगाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. ओम पुरी यांच्याबरोबरच्या नात्याची आठवण सांगताना सीमा कपूर यांनी दावा केला की, लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी ओम पुरी यांनी घरातील मोलकरणीबरोबरच्या प्रेमसंबंधाबद्दल त्यांना सांगितलं होतं.
याशिवाय त्यांनी असा आरोपही केला की, नंतर ओम पुरी यांनी दुसरी पत्नी नंदिता पुरी यांचीही फसवणूक केली. विशेष म्हणजे, त्या गरोदर असतानाच त्यांना या गोष्टीची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सीमा कपूर यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ओम पुरी यांच्याशी झालेल्या लग्नापासून ते घटस्फोटापर्यंतच्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी एक अत्यंत वेदनादायी खुलासाही केला. ओम पुरी यांचं घर सोडल्यानंतर, त्यांचं बाळही वाचू शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं. सीमा कपूर या बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांच्या सख्ख्या बहिण आहेत. लग्नापूर्वीच्या दिवसांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “१९८९ मध्ये आमचा साखरपुडा झाला. नेमकं काय कारण होतं हे मला माहीत नाही, पण दोन्ही कुटुंबांनी आमच्या लग्नासाठी खूप घाई केली. अन्नू भैया तेव्हा शूटिंगसाठी बाहेर गेले होते. आपल्या लाडक्या बहिणीचा साखरपुडा झाल्याचं त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडून समजलं, त्यामुळे ते खूप नाराज झाले होते.”
लग्नाच्या आदल्या दिवशी मोलकरणीबरोबरच्या प्रेमसंबंधाची दिली कबुली
सीमा कपूर पुढे म्हणाल्या,”त्या काळात मोबाईल किंवा फोन सहज उपलब्ध नव्हते. लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी ओम यांनी मला घरातील मोलकरणीबरोबरच्या त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं.” हा धक्कादायक खुलासा ऐकूनही आपण लग्न करण्याचा निर्णय बदलला नाही, असं सांगताना त्या म्हणाल्या, “त्यावेळी खूप उशीर झाला होता. शेवटच्या क्षणी लग्न मोडणं शक्य नव्हतं. सर्व पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि स्वागत समारंभाचीही तयारी झाली होती. आम्ही झालावाड या छोट्या शहरात होतो, जिथे माझ्या आई-वडिलांचा खूप सन्मान केला जायचा. ते मला नदीकिनारी एका बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले की, त्यांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.”
बाळ गमावल्यानंतरही भेटायला आले नाहीत – सीमा कपूर
सीमा कपूर पुढे म्हणाल्या, “लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न मोडण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. आजकालच्या महिला अधिक धाडसी आहेत. काही जणी तर लग्नाच्या दिवशीही चुकीचा निर्णय असल्याचं वाटल्यास मागे हटतात.” घटस्फोटाच्या काळातील कठीण दिवसांची आठवण सांगताना त्यांनी आरोप केला की, नंदिता पुरी यांच्याबरोबरच्या ओम पुरी यांच्या नात्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आपल्या होणाऱ्या बाळालाही गमावलं. सीमा कपूर यांच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटाच्या वेळी ओम पुरी यांनी त्यांना ६ लाख रुपयांची पोटगी दिली होती. त्या पुढे म्हणाल्या, “बाळ गमावल्यानंतर ओम पुरी मला धीर देण्यासाठी किंवा भेटायला आले नाहीत.”
ओम पुरी आणि सीमा कपूर यांनी १९९० मध्ये लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर ओम पुरी यांनी १९९३ मध्ये नंदिता पुरी यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही आणि २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर जानेवारी २०१७ मध्ये वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने ओम पुरी यांचं निधन झालं.
