बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांबरोबर अनेकदा एकत्र दिसणारा ओरहान अवत्रामणी, ज्याला ओरी या नावाने ओळखलं जातं, त्याने त्याच्या आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे. या घटनेने त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती अशा पद्धतीने बदलून टाकलं, असं म्हटलं आहे. ओरीने बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंह यांच्यामुळे त्याला या धक्कादायक प्रसंगातून जावं लागलं असा खुलासा केला आणि २०२१ मध्ये या घटनेचा आपल्यावर खोलवर परिणाम झाल्याचं सांगितलं. त्याने हा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ असल्याचं म्हटलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओरीने २०२१ मध्ये अमृता सिंह यांच्याशी संबंधित घडलेल्या घटनेची आठवण सांगितली. यावेळी त्याने अमृता सिंह यांचा उल्लेख अमृता अली खान असा केला. आपल्या आयुष्यातील तो काळ अत्यंत कठीण असल्याचं सांगताना, या अनुभवाचा आपल्यावर दीर्घकाळ परिणाम झाला आणि यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या एका कठीण टप्प्यातून आपल्याला जावं लागलं, असं ओरीने म्हटलं.

अमृता अली खानने मला मानसिक त्रास दिला – ओरी

ओरी म्हणाला, “२०२१ मध्ये अमृता अली खान (अमृता सिंह) यांनी मला जो मानसिक त्रास दिला, तो खूपच भयानक होता. याआधी मी कधीच अशा परिस्थितीतून गेलो नव्हतो. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि धक्कादायक काळ होता. त्या अनुभवाने मला अक्षरशः नरकयातना झाल्या”.

या अनुभवामुळे ओरीमध्ये झाला मोठा बदल

ओरीने सांगितलं की, त्याच्या जवळची माणसं त्याला सतत सांगायची की, हा अनुभव भविष्यात त्याला आणखी मजबूत बनवेल. मात्र, त्या काळातून जात असताना त्याला हे सगळं ऐकून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला फक्त हा कठीण काळ लवकर संपावा, असंच वाटत होतं. नंतर मात्र या अनुभवाने आपल्याला आतून किती बदललं आहे, याची त्याला जाणीव झाली. या प्रसंगामुळे आता कोणत्याही गोष्टींचा स्वतःवर फारसा परिणाम होऊ न देण्याची मानसिकता निर्माण झाली, असं ओरीने सांगितलं.

ट्रोलिंगचा कधीच परिणाम झाला नाही – ओरी

ओरी म्हणाला, “जेव्हा मी त्या परिस्थितीतून बाहेर पडलो, तेव्हा लोक मला सांगायचे की, तू यातून बाहेर पडशील आणि आणखी खंबीर होशील. तेव्हा मला वाटायचं, मला इतकंही खंबीर व्हायचं नाहीये म्हणजे, आयुष्यात कोणाला एवढं कठोर व्हायचं असतं? पण नंतर मला जाणवलं की, आता कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. कोणतीही गोष्ट मला फारशी दुःखी करत नाही. मला वाटतं, त्या काळात मी ज्या मानसिक धक्क्यातून गेलो, त्याने मला इतकं खंबीर केलं की, जेव्हा मी प्रकाशझोतात आलो तेव्हा सुरुवातीला माझ्यावर झालेल्या टीकेचाही माझ्यावर कधी परिणाम झाला नाही”.

ओरीने आपल्या या मानसिकतेचा संबंध तो सध्या सहभागी होत असलेल्या ‘खतरों के खिलाडी १५’ या शोमधील अनुभवाशीही जोडला. त्याने मान्य केलं की, एका अर्थाने या अनुभवासाठी तो अमृता सिंह यांचा आभारी आहे. त्या कठीण प्रसंगातून गेल्यामुळेच पुढे आयुष्यात आवश्यक असलेली मानसिक कणखरता त्याच्यात निर्माण झाली, असं त्याला वाटतं. ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये जेव्हा त्याला त्याच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन आव्हानांचा सामना करावा लागला, तेव्हा ही मानसिक ताकद स्पष्टपणे दिसून आली, असं त्याने सांगितलं. ओरीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.