Vinod Khanna and Osho: विनोद खन्ना जितके त्यांच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले, तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा होताना दिसली. आध्यात्मिक गुरू ओशोंनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी चित्रपट कारकि‍र्दीत शिखरावर असताना अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आता विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांनी विनोद खन्ना जेव्हा ओरेगॉन समुदायात राहण्यासाठी गेले, तेव्हा काय घडले होते हे यूट्यूबवर सांगितले आहे.

“त्या पाणी पुरवठ्यात विषबाधा…”

कविता म्हणाल्या होत्या, “ओरेगॉन आश्रमात जो पाणी पुरवठा होत असे, त्या पाणी पुरवठ्यात विषबाधा झाली होती. त्यामुळे विनोद खन्ना आजारी पडले होते. त्यामुळे खूप भीती वाटत होती. त्यांनी त्यांच्या मुलांना पाहिले नव्हते. ते मला सांगायचे की त्यावेळी ते खूप रडायचे. ते भारतात परत येऊ शकत नव्हेत. कारण-जर तेव्हा ते भारतात आले असते तर ते पुन्हा परत जाऊ शकले नसते.”

कविता यांच्या मतानुसार, ओरेगॉन समुदाय नष्ट होण्यापूर्वीच विनोद त्या सगळ्यातून बाहेर पडले होते ही चांगली गोष्ट होती. विनोद खन्नांच्या भावाने त्यांना तिथून बाहेर काढले होते, कारण त्यानंतर ओशोंना अटक झाली.

जेव्हा ओरेगॉनमधून विनोद खन्ना बाहेर आले, तेव्हा ते नैराश्यात गेले होते असेही कविता खन्ना म्हणाल्या. “जेव्हा त्याने ओरेगॉन सोडले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसत होता. ते मला सांगत असत की मी सेटवर गेलो, सीनचे उत्तम शूटिंग केले, त्यानंतर व्हॅनमध्ये आलो आणि फक्त रडत राहिलो.”

पुढे त्या म्हणाल्या, “जेव्हा ओशो ऑरेगॉनमधून परत आले, तेव्हा ते दिल्लीला आले. विनोद त्यांना मनालीला घेऊन गेले. तेथे त्यांनी एक महिना घालवला. नंतर जेव्हा ते परत आले, तेव्हा विनोदने पुण्यातील आश्रमाची जबाबादारी घ्यावी, अशी इच्छा असल्याचे ओशोने सांगितले. विनोद मला म्हणाले होते की ही पहिली आणि एकमेव वेळ होती, जेव्हा ते त्यांच्या गुरूंना नाही म्हणाले. त्यानंतर विनोद कधीही ओशोला भेटले नाहीत, ते चित्रपटसृष्टीत परत आले.”