एकेकाळी बॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांची पसंती मिळवत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आज त्यांचा ६१वा वाढदिवस साजरा करत आहेत. ९ वर्षांच्या असतानाच पद्मिनी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. परंतु, त्या फक्त त्यांच्या व्यावसायिक नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

पद्मिनी कोल्हापुरेंचा जन्म मुंबईत १ नोव्हेंबर रोजी झाला होता. एबीपीच्या वृत्तानुसार त्यांनी बालकलाकार म्हणून दिग्गज अभिनेते देवानंद यांच्या ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘साजन बिना ससुराल’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘इंसाफ का तराजू’ आणि ‘थोडी सी बेवफाई’ यांसारख्या चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केलं. १४व्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

प्रेमरोगसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या ‘प्रेम रोग’मधून मुख्य नायिका म्हणून पदार्पण केलं. चित्रपटातील त्यांच्या कामासाठी त्यांना १९८२मध्ये फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांचं वय १७ वर्षे होतं. यानंतर त्यांनी ‘सौतन’, ‘मरते दम तक’, ‘वो सात दिन’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘प्यार झुकता नही’ आणि ‘विधाता’ सारख्या चित्रपटांत काम केलं.

२१व्या वर्षी पळून जाऊन केलेलं लग्न

व्यावसायिक आयुष्यात यश मिळत असताना त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मात्र त्या चर्चेचा विषय ठरत होत्या. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार याचं कारण होतं त्यांचं निर्माते प्रदीप शर्मा यांच्याबरोबरचं नातं. दोघांनी ‘ऐसा प्यार कहाँ’ या १९८६ साली आलेल्या चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळीच सेटवर त्यांची पहिली भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. परंतु, या नात्यामुळे पद्मिनी यांच्या कुटुंबं आनंदी नव्हतं. त्यामुळे त्यांनी १९८६मध्येच प्रदीप शर्मा यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं असं म्हटलं जातं. त्यावेळी त्या फक्त २१ वर्षांच्या होत्या. या दोघांना एक मुलगा असून त्यांचं नाव प्रियांक शर्मा असं आहे.

दरम्यान, पद्मिनी कोल्हापुरेंनी लग्नानंतर पूर्वीप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करणं बंद केलं. मात्र काही काळानंतर त्यांनी ‘चिमणी पाखरे’, ‘कुरबानी रंग लायेगी’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं. ‘चिमणी पाखरे’ हा मराठीतील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.