Padmini Kolhapure and Shraddha Kapoor: ‘चिमणी पाखरं’, ‘प्रवास’, ‘मंथन’ अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी पद्मिनी कोल्हापुरे ओळखल्या जातात. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. देव आनंद यांच्या ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे. १९७४ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

१९७८ ला प्रदर्शित झालेल्या सत्यम शिवम सुंदरम या सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यादरम्यान त्यांनी ड्रीम गर्ल, साजन बिना सुहाग या सिनेमातदेखील काम केले.

१९८० ला प्रदर्शित झालेल्या ‘इन्साफ का तराजू’ या सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यावेळी त्या १५ वर्षांच्या होत्या. हा सिनेमा प्रचंड गाजला. तसेच, त्यांची लोकप्रियता वाढली. पुढे त्यांनी प्रमुख भूमिकेत काम केलेले अनेक सिनेमे गाजले. यामध्ये प्रेम रोग या सिनेमाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

प्रेम रोग हा सिनेमा १९८२ ला प्रदर्शित झाला होता. राज कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. याबरोबरच, सौतन, प्यार झुकता नही, सत्यम शिवम सुंदरम, वो सात दिन, अहिस्ता अहिस्ता, दादागिरी, विधाता, स्वर्ग से सुंदर या चित्रपटांतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक गाणीदेखील गायली.

पद्मिनी कोल्हापुरेंची भाची बॉलीवूडवर करतेय राज्य

आता पद्मिनी कोल्हापुरे यांच्याप्रमाणेच त्यांची भाचीदेखील एकापेक्षा एक चित्रपटात काम करत आहे. तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर होय.

श्रद्धा कपूर ही शिवांगी कोल्हापुरे व शक्ती कपूर यांची मुलगी आहे. पद्मिनी कोल्हापुरे या श्रद्धाची मावशी आहेत. श्रद्धा कपूरने २०१० मध्ये तीन पत्ती या सिनेमातून पदार्पण केले. २०१३ ला प्रदर्शित झालेल्या आशिकी २ या सिनेमातून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. हैदर, एक व्हिलन, बागी, छिछोरे या चित्रपटातून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला स्त्री हा सिनेमा प्रचंड गाजला. हा सिनेमा २०१८ ला प्रदर्शित झाला होता. तसेच, स्त्री २नेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. या सिनेमाने अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडले होते.

अभिनेत्री लवकरच व्ही.शांताराम या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता. तिच्या लूकवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

दरम्यान, या चित्रपटाबरोबरच ती आणखी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.