Padmini Kolhapure on Rishi Kapoor: काही जुने सिनेमे आजही लोकप्रिय आहेत. आजही हे सिनेमे पाहिले जातात. ऋषी कपूर यांचे अनेक सिनेमे गाजले. त्यांनी रोमँटिक सिनेमांबरोबरच काही अॅक्शन चित्रपटांतही काम केले. आजही त्यांच्याबद्दल, त्यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल त्यांचे सहकलाकार आठवणी सांगतात.
आता मराठमोळ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करण्याची आठवण सांगितली. इंडियन आयडॉलच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत. त्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये त्या त्यांच्या काही चित्रपटांचे किस्से सांगत असल्याचे दिसत आहे.
“त्यांच्याबरोबर काम करताना माझ्याकडून…”
पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘पूछो ना यार क्या हुआ’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, “पहिल्यांदाच मला प्रमुख भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. तसेच, प्रमुख भूमिकेत काम करत असताना रोमँटिक गाण्यात काम करण्याची संधी मिळाली होती. या गाण्यात माझ्याबरोबर ऋषी कपूर होते. ऋषी कपूर त्या काळातील सर्वांत लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होते.”
ऋषी कपूर यांच्याबरोबर रोमँटिक गाण्यात काम करण्याचा अनुभव सांगत पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “ऋषी कपूर यांच्याबरोबर रोमँटिक गाण्याचे शूटिंग करण्याआधी मला खूप भीती वाटत होती. इतक्या मोठ्या कलाकाराबरोबर रोमँटिक गाण्यात काम करायचे आहे. त्यांच्याबरोबर काम करताना माझ्याकडून काही चूक होऊ नये, याची भीती वाटत होती. पण, ऋषी कपूर यांनी मला इतकी चांगली वागणूक दिली की, माझी भीती पूर्णपणे कमी झाली. त्यांनी मला अवघडलेपण जाणवू दिले नाही आणि पूर्ण शूटिंगदरम्यान माझी काळजी घेतली.”
पुढे त्या म्हणाल्या, “या गाण्याचे शूटिंग ऊटीमध्ये झाले होते.या गाण्याचे चांगल्या पद्धतीने शूटिंग व्हावे, यासाठी संपूर्ण टीमने खूप कष्ट घेतले होते. आज इतक्या वर्षांनंतरही लोकांना हे गाणे आवडते. याबरोबरच होगा तुमसे प्यारा कौन हे गाणेसुद्धा आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांना आजही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते”, असे म्हणत पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
पद्मिनी कोल्हापुरे आशा भोसलेंबद्दल म्हणाल्या…
त्याबरोबरच याच शोमध्ये त्यांनी आशा भोसले यांच्याबद्दलही वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, आशा भोसले प्रत्येक गाण्यातील भावना पूर्णपणे समजून घ्यायच्या. रेकॉर्डिंग करण्यापूर्वी अभिनेत्री पडद्यावर कोणत्या प्रकारची भावना दाखवत आहे हे समजून घेण्याचा त्या प्रयत्न करायच्या. त्यामुळे जेव्हा त्या गायच्या आणि अभिनेत्री त्यावर अभिनय करायची, तेव्हा लोकांना असे वाटायचे की, पडद्यावरील अभिनेत्री स्वतःच ते गाणे गात आहे.
