Pahlaj Nihalani : ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं गुरुवारी, ४ जून रोजी वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं. त्यांनी १९८२ मध्ये ‘हथकडी’ या शत्रुघ्न सिन्हा अभिनित चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोविंदाबरोबर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळालं.

गोविंदाने १९८६ मध्ये ‘लव्ह ८६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतरच्या काळात पहलाज निहलानी यांनी गोविंदा मुख्य भूमिकेत असलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली जे यशस्वी ठरले. २००० च्या दशकादरम्यान गोविंदाचं स्टारडम कमी झाल्यानंतरही निहलानी यांनी नेहमीच त्याचं कौतुक केलं. ते गोविंदाला एक अष्टपैलू कलाकार मानायचे आणि त्याचं नेहमीच कौतुक करायचे.

गोविंदाबद्दल काय म्हणालेले पहलाज निहलानी?

याआधी ‘लर्न फ्रॉम द लिजेंड’ला दिलेल्या मुलाखतीत पहलाज निहलानी यांनी सांगितलं होतं की, त्यांनी गोविंदाबरोबर चार चित्रपट केले होते. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इल्जाम’ या चित्रपटासाठी कलाकार निवडताना त्यांच्या मनात प्रथम गोविंदाचं नाव आलं होतं. पहलाज म्हणालेले, “सुरुवातीला मी त्याचे फोटो पाहिले होते आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर त्याचा लूक मला फारसा आवडला नव्हता. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या डान्सची व्हिडीओ कॅसेट घेऊन आला. त्या काळात मायकल जॅक्सनमुळे ब्रेकडान्स खूप लोकप्रिय झाला होता. मी त्याला त्याच्या कौशल्यांबद्दल विचारलं. त्याचा चेहरा मला फारसा आवडला नव्हता, पण त्याचा डान्स, अॅक्शन आणि काम करण्याची क्षमता पाहून मी त्याला चित्रपटात घेतलं. माझ्या कथेत भरपूर अॅक्शन होतं, त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाचा वेळ मागितला होता.”

पुढे त्यांनी गोविंदाच्या कौशल्याचं कौतुक करत म्हटलं होतं की, “आजपर्यंत गोविंदाएवढा प्रतिभावान कलाकार मी पाहिलेला नाही.” पहलाज निहलानी यांनी सांगितलं होतं की, १९९२ मधील ‘शोला और शबनम’ आणि १९९३ मधील ‘आंखें’ या चित्रपटांसाठी त्यांनी गोविंदाची निवड केली, तेव्हा त्याच्याकडे फारसं काम नव्हतं. ते म्हणालेले, “जेव्हा गोविंदाकडे काम नव्हतं, तेव्हा मी त्याला शोला और शबनम हा चित्रपट दिला. त्या चित्रपटातून त्याने पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याकडे काम कमी असताना मी त्याला आंखें दिला. शोला और शबनम आणि आंखें हे दोन्ही चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.”

मात्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार गोविंदाकडे त्या काळात कामाची कमतरता नव्हती. १९९१ मध्ये त्याचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते, तर १९९२ मध्ये सहा आणि १९९३ मध्ये तब्बल सात चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण यानंतर पुढे गोविंदाने ‘पार्टनर’ सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतरही त्याच्या समस्या काही कमी झाल्या नाही. याबद्दल बोलताना पहलाज निहलानी यांनी सांगितलेलं की, त्या काळात “सगळंच गोविंदाच्या विरोधात घडत होतं.”

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “पार्टनरनंतरही त्याला फारसे चित्रपट मिळाले नाहीत. प्रियंका चोप्राबरोबरचा एक मोठा चित्रपटही बंद पडला. एखादी व्यक्ती तुमच्या पाठीमागून वार करते, तेव्हा त्याची कोणतीही खूण दिसत नाही. तुम्हाला ते कळतही नाही. गोविंदाच्या बाबतीतही अनेकदा असंच झालं. अनेक वेळा त्याचा पाय खेचण्यात आला.”

पहलाज निहलानी गोविंदाचं कौतुक करत असंही म्हणाले होते की गोविंदासारखा प्रतिभावान कलाकार असूनही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र या सर्व चढ-उतारांमध्येही तो स्वतःला सावरत काम करत राहिला.