‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल रविवारी (२३ जून) लग्नबंधनात अडकणार आहेत. एका लीक झालेल्या डिजिटल पत्रिकेनुसार, हा सोहळा मुंबईत होणार आहे. पूनम ढिल्लों आणि हनी सिंग सारख्या सेलिब्रिटींनी सोनाक्षी व झहीरच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे, मात्र या जोडप्याने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी यावर भाष्य केलेलं नाही. आता शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या व्यक्तीने लग्नाच्या अफवा खऱ्या असल्याचं म्हटलं आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) माजी अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सोनाक्षी सिन्हाच्या कुटुंबाचे जवळचे मित्र पहलाज निहलानी यांनी या लग्नाची पुष्टी केली आहे. पहलाज यांना सोनाक्षी मामा म्हणते. तर तिच्या मामांनी तिच्या लग्नाला जाणार असल्याचं म्हटलं आहे. सोनाक्षीबरोबरच्या कथित तणावपूर्ण संबंधांमुळे तिचे वडील आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा लग्नाला उपस्थित राहणार नाहीत अशा चर्चा होत्या, यावरही पहलाज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo

‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःला सोनाक्षीचे मामा म्हणणाऱ्या पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हांच्या उपस्थितीशिवाय लग्न होऊ शकत नाही, असं म्हटलंय. शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाविषयी माहिती नसल्याचं विधान केलं होतं, त्यावर निहलानी म्हणाले की लोकसभा निवडणुकीमुळे शत्रुघ्न सिन्हा तीन महिन्यांपासून घरी नाहीत, त्यामुळे त्यांना माहित नसावं. पण सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनी लग्नाची तयारी चालू ठेवली असेल आणि कदाचित ते परत आल्यावर त्यांना कळवायचं ठरवलं असेल. शत्रुघ्न लग्नाला नक्कीच उपस्थित राहणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. “सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात सर्व काही ठीक आहे,” असं निहलानी म्हणाले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षीने आधीच न कळवल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा नाराज आहेत का, असं विचारलं असता निहलानी म्हणाले, “सोनाक्षी त्यांची सर्वात लाडकी आहे. त्यामुळे ते तिच्याशी नाराज राहणार नाहीत. आपल्या मुलीने स्वत: निवडलेल्या जोडीदाराशी लग्न केल्याने वडील का नाराज असतील?” असा प्रश्नही त्यांनी केला. “शत्रुजींनी स्वतः ४० वर्षांपूर्वी त्यांच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं होतं,” असं ते म्हणाले.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार की निकाह? जवळच्या मैत्रिणीने दिली मोठी माहिती

सोनाक्षी व झहीर यांचे लग्न २३ जून रोजी सकाळी होईल आणि संध्याकाळी रिसेप्शन असेल, अशी माहिती देखील पहलाज निहलानी यांनी दिली. दोघांच्या लग्नाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता चाहते सोनाक्षी व झहीर लग्नाबद्दल कधी अपडेट देतील याची आतुरतेने वाट पाहत आहेत.