या बॉलीवूड अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांनी आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. पण जेव्हा गीता कपूर यांना आधाराची गरज होती, तेव्हा मुलगा त्यांना एकटं सोडून पळून गेला. या दुर्दैवी अभिनेत्रीचं नाव गीता कपूर. त्यांनी ‘पाकिजा’ आणि ‘रजिया सुल्तान’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गीता कपूर यांना मुलगा रुग्णालयात तडफडत सोडून निघून गेला होता. इतकंच नाही तर त्यांचं निधन झाल्यावर तो त्यांना अखेरचं पाहायला किंवा अंत्यसंस्कारासाठीही आला नाही.
गीता कपूर यांनी २०१७ मध्ये स्वतः ‘ईटाइम्स’ला आपल्या आयुष्यातील व्यथा सांगितली होती. गीता घोडेस्वारी करण्यात पटाईत होत्या आणि डान्सही खूप छान करायच्या. याच बळावर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
मुलाच्या उपचारासाठी घर विकले, पण त्याच मुलाने…
जवळपास दोन दशके गीता कपूर जुहू येथील आपल्या आलिशान बंगल्यात राहत होत्या, पण मुलाच्या उपचारासाठी त्यांना आपलं घर विकावं लागलं होतं. त्यानंतर गीता कपूर आपल्या कुटुंबासह गोरेगाव येथील एका फ्लॅटमध्ये राहू लागल्या. पण अवघ्या तीन महिन्यांतच मुलाने त्यांना आजारपणाच्या नावाखाली रुग्णालयात दाखल केलं आणि नंतर गोरेगावचा तो फ्लॅट विकून तो पळून गेला.
मुलगा मारायचा, उपाशी कोंडून ठेवायचा – गीता कपूर
गीता कपूर यांनी आपल्या मुलावर मारहाण करत असल्याचा गंभीर आरोपही केला होता. ‘स्क्रीन’च्या वृत्तानुसार, “माझा मुलगा मला मारहाण करायचा, कारण मला त्याच्या ऐशोआरामाच्या सवयी आवडत नव्हत्या. तो मला चार दिवसांतून एकदाच जेवायला द्यायचा आणि कधीकधी तर अनेक दिवस मला खोलीत कोंडून ठेवायचा. मी वृद्धाश्रमात जात नव्हते, म्हणूनच त्याने हा सगळा कट रचला. त्याने मला जाणूनबुजून उपाशी ठेवलं, त्यामुळे मी आजारी पडले. त्यानंतर त्याने मला रुग्णालयात दाखल केलं आणि स्वतः पळून गेला,” असा दावा गीता कपूर यांनी केला होता.

गीता कपूर यांच्या मुलाने बिलही भरलं नव्हतं
गीता कपूर यांच्या मुलाचे नाव राजा असून तो पेशाने कोरिओग्राफर होता, तर त्यांची मुलगी एअर होस्टेस होती. मुलांची परिस्थिती चांगली असूनही गीता कपूर यांच्यावर ही परिस्थिती ओढवली. गोरेगांव (पश्चिम) येथील एसआरव्ही हॉस्पिटलचे डॉ. दीपेंद्र त्रिपाठी यांनी २०१७ मध्ये सांगितलं होतं की, गीता कपूर यांच्या मुलाने २१ एप्रिल रोजी रुग्णवाहिका बोलावली आणि आपल्या आईला रक्तदाबाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मुलाने रुग्णालय प्रशासनाला सांगितलं की तो सैन्यात आहे. त्यानंतर तो एटीएममधून पैसे काढून आणतो असं सांगून निघून गेला. तो सुरुवातीला मेसेजद्वारे संपर्कात होता, पण तो कधीच परत आला नाही आणि त्याने रुग्णालयाचं बिलही भरलं नाही.
कोणी भरले होते रुग्णालयाचे बिल?
दुसरीकडे, गीता कपूर या आपल्या मुलाची वाट पाहत रुग्णालयात तडफडत होत्या आणि प्रचंड नैराश्यात गेल्या होत्या. त्या जेवत नव्हत्या आणि आपल्या मुलाला हाका मारत रडत असायच्या. अशा कठीण प्रसंगी चित्रपट निर्माते अशोक पंडित आणि रमेश तौरानी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनीच गीता कपूर यांचे रुग्णालयाचे बिल भरले. त्या थोड्या बऱ्या झाल्यावर त्यांना एका वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं की त्यांनी गीता कपूर यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यांना न्यायला आलाच नाही. जेव्हा काही लोक त्यांच्या घरी गेले, तेव्हा तिथे कुलूप होते. चौकशीत समजलं की त्यांचा मुलगा घर विकून पळून गेलाय.
गीता कपूर यांच्यावर मुलीने केलेले अंत्यसंस्कार
२०१८ मध्ये गीता कपूर यांचं निधन झालं. अशोक पंडित यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, गीता कपूर यांनी शेवटच्या ४ महिन्यांत काहीच खाल्लं नव्हतं. त्यांना फक्त लिक्विड डाएटवर जिवंत ठेवण्यात आलं होतं. आपला मुलगा येईल आणि आपल्याला घरी घेऊन जाईल, याच आशेवर त्या होत्या, पण तो कधीच आला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मुंबईच्या कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला होता, जेणेकरून जर त्यांची मुलं आली तर त्यांना आईचा चेहरा शेवटचा बघता येईल, पण त्यांचा मुलगा आलाच नाही. शेवटी गीता कपूर यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते, असं अशोक पंडित यांनी सांगितलं होतं.
