Shoaib Akhtar Salman Khan Bollywood Movie Offer: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा क्रिकेटबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शोएब अख्तरने त्याला बॉलीवूडमधून ऑफर आल्याचा खुलासा केला. विशेष म्हणजे, सलमान खाननेसुद्धा शोएब अख्तरला बॉलीवूडमध्ये सिनेमाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ती नाकारल्याचा खुलासा स्वतः केला आहे.

पाकिस्तानी स्टँड-अप कॉमेडियन ताबिश हाशमीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शोएब अख्तरने बॉलीवूडमधून ऑफर आल्याचा उल्लेख केला. अनुराग बसू दिग्दर्शित रोमँटिक थ्रिलर ‘गँगस्टर’ सिनेमाची ऑफर शोएब अख्तरला आल्याचा दावा त्याने केला आहे. या सिनेमामध्ये इमरान हाश्मीने आकाश, कंगना रणौतने सिमरन आणि शायनी आहुजाने दयाशंकर या भूमिका साकारल्या होत्या. पण, शोएबला इम्रान हाश्मीची नाही तर दुसऱ्या भूमिकेची ऑफर दिल्याचे शोएब अख्तरने स्पष्ट केले.

शोएब अख्तरने दिला सलमान खानला नकार

सलमान खाननेही शोएब अख्तरला एका भूमिकेची ऑफर दिल्याचा खुलासा केला आहे. शोएब म्हणाला, “सलमान खानने मला एका सिनेमाची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली; कारण मला माझा वेळ दोन प्रोफेशनमध्ये विभागायचा नव्हता. प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना सिनेविश्वाला वेळ देता येत नव्हता. जर सिनेमामध्ये काम केलं असतं तरी माझं नाव कोणत्यातरी अभिनेत्रीबरोबर जोडलं गेलं असतं.”

शोएब अख्तरने का नाकारला बॉलीवूड सिनेमा?

पुढे शोएब म्हणाला, “मी दोन वेगवेगळ्या जगात राहू शकत नव्हतो. मी सहा-सात महिने क्रिकेट खेळायचो आणि मग सहा-सात महिने शूटिंग करत होतो. पण, त्यातही माझं नाव काही महिलांबरोबर जोडण्यात आलं होतं. याबद्दल मी विचारसुद्धा केला. त्यावेळी मला दिग्दर्शकांनी सांगितलं, ‘खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी मला फार काही करण्याची गरज नाही.’ पण मला काही गोष्टी जाणवल्या, त्या म्हणजे मी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही. एकीकडे माझा फिटनेस माझ्यासाठी महत्त्वाचा होता, तर दुसरीकडे माझ्यावर फिल्म हिट झालीच पाहिजे असा दबाव होता, त्यामुळे मी नकार दिला; कारण लाईट्स आणि कॅमेऱ्यासाठी हे करू शकत नव्हतो.”

पुढे शोएब अख्तरने सलमान खानच्या स्वभावाचे कौतुक केले. तो म्हणाला, “मी शरीरयष्टीने सलमान खानसारखा वाटतो, पण खरंतर सलमान खान माझ्यापेक्षा खूपच चांगला व्यक्ती आहे. त्याच्यासमोर मी काहीच नाही. तो खूपच चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आहे. तो खूप लोकांना मदत करतो आणि दानधर्म करत असतो.”

दरम्यान, एकदा शोएब अख्तरला विचारण्यात आलं होतं, ‘त्याच्या बायोपिकमध्ये शोएबची भूमिका कोणी साकारलेली त्याला आवडेल?’ यावर शोएब अख्तरने सलमान खानने साकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती.