‘धुरंधर’ चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही तो पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘धुरंधर’ला पाकिस्तानविरोधी भूमिकेमुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया व यूएईसह सहा आखाती देशांमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे, पण तरीही सीमेपलीकडील लाखो लोक हा चित्रपट पाहत आहेत.
‘धुरंधर’ रिलीज झाला नाही, मग पाकिस्तानमधील लोक तो कसा पाहू शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर धुरंधरच्या टॉरेंट आणि पायरसी लिंक्सचा इंटरनेटवर पूर आला आहे. यावरूनच चित्रपट डाउनलोड करून पाकिस्तानमधील लोक पाहत आहेत. पाकिस्तानचे डार्क वेब एक्सपर्ट्स श्रीलंका, नेपाळ आणि मलेशियामधील सर्व्हरद्वारे धुरंधरच्या लिंक्स मिळवत आहेत आणि तयारही करत आहेत.
बंदी असूनही पाकिस्तानात पाहिला जातोय धुरंधर
आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ चिनी होस्टिंग वेबसाइट्स व इतर विविध प्लॅटफॉर्मवर कमी रिझोल्यूशनच्या ‘कॅम-प्रिंट’ स्वरूपात उपलब्ध आहे. धुरंधरची क्रेझ फक्त भारतातच नाही, तर सीमेपलिकडेही आहे. मुख्य म्हणजे बंदी असूनही हा चित्रपट पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, आयएसआय आणि आयएसपीआरशी कथितपणे लिंक्ड असल्याचा आरोप असलेल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून धुरंधरच्या लहान क्लिप्स वापरल्या जात आहेत. ते या क्लिप्स शेअर करून भारतीय चित्रपटांची, कथानकाची खिल्ली उडवत आहेत. पण दुसरीकडे, देशात बंदी असूनही पाकिस्तानमधील लोक डार्क वेबवरून धुरंधर चित्रपट डाउनलोड करून मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर पाकिस्तानी लोक मोठ्या प्रमाणात रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहेत.
पाकिस्तानमध्ये दाखल करण्यात आली याचिका
या चित्रपटात कराचीच्या लियारी भागाला दहशतवाद्यांचा अड्डा म्हणून दाखवण्यात आलंय. यामुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. या चित्रपटात राजकीय प्रतिमांही वापरण्यात आल्या आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) झेंडे आणि दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या फोटोंचा समावेश आहे. पीपीपी कार्यकर्ते मोहम्मद आमिर यांनी कराची न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल केली आहे. भुट्टो यांची बदनामी केल्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाला दहशतवादाशी जोडल्याबद्दल चित्रपटाचे कलाकार आणि चित्रपटाशी संबंधित लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
धुरंधरमधील रणवीर सिंहची भूमिका व इतर कलाकार
‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंहने हमझा नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. हमझा आयएसआयचं दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानच्या लियारीमध्ये घुसखोरी करतो, यावर हा सिनेमा बेतलेला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि अर्जुन रामपाल हे कलाकार आहेत.
पाकिस्तानमधील मंत्र्यांनी केली टीका
सिंधचे माहिती मंत्री शरजील इनाम मेमनसह पाकिस्तानमधील बऱ्याच राजकारण्यांनी ‘धुरंधर’ या चित्रपटावर टीका केली आहे. धुरंधर हा पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करण्यासाठी तयार केलेला एक नकारात्मक प्रोपगंडा चित्रपट आहे, असं त्यांनी म्हटलंय. धुरंधर या चित्रपटात लयारीची संस्कृती दाखवण्यात आलेली नाही, तर फक्त तेथील गँगवॉर आणि हिंसाचार दाखवण्यात आला आहे, असं म्हटलंय.
पाकिस्तानने केली ‘मेरा लायरी’ चित्रपटाची घोषणा
‘धुरंधर’ची जगभरात क्रेझ पाहायला मिळतेय. या चित्रपटावर पाकिस्तानमधून टीका होत असतानाच सिंध सरकारने ‘मेरा लायरी’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये रिलीज होईल. चित्रपटाचं दिग्दर्शन अबु अलीहा करणार आहे.
