सलमान खान अनेकदा नवोदित कलाकारांना त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी देत असतो, असं अनेकदा कलाकार म्हणताना दिसतात. कतरिना कैफ, जॅक्लिन फर्नांडिस यांना सलमान खाननेच पहिली संधी दिली होती. यांच्यासह इंड्सट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सलमान खानने त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि आज ते प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीलाही सलमान खानने त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. हा पलकचा पहिलाच चित्रपट होता. अशातच पलकने सलमान खानसह काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला आहे.

पलकने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये सलमान खानसह दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात नवोदित कलाकारांची मोठी फौज होती. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटापूर्वी तिने सलमानच्या ‘अंतिम’साठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. हा चित्रपट प्रवीण तर्डे यांच्या ‘मुळशी पॅर्टन’चा रिमेक होता. या चित्रपटासाठी पलकने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, पण यासाठी तिने कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलं नसल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘अंतिम’बद्दल पलक म्हणाली, “मी या चित्रपटासाठी पैसे न घेता काम केलं. जेव्हा तुम्हाला सलमान खानबरोबर काम करायला मिळतं तेव्हा पैशांबद्दल कोण विचारतं” ‘अंतिम’मध्ये आयुष शर्मा व सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत होते.”

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी सलमान खान यांच्याबरोबर पूर्ण चित्रपट केला आहे. पण, जेव्हाही मी त्यांना भेटते तेव्हा भारावून जाते. त्यांनी माझं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकलं. मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. चित्रपटाच्या सेटवर मला खूप गोष्टी शिकता आल्या. नवीन मित्र-मैत्रीण झाले. खूप चांगल्या प्रकारे माझं या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झालं.” पुढे तिने सेटवर सलमान खान त्या सर्वांची कशी काळजी घ्यायचा याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “आम्ही सेटवर खूप मज्जा करायचो. खूप वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवायचो. सलमान सर अनेकदा आमच्यासाठी मिठाई आणायचे. त्यांचा डाएट या प्रकारावर विश्वास नाही, पण ते सांगतात की आपल्या शरीराला समजून घेऊन त्यानुसार खायचं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलक पुढे म्हणाली, “सलमान खान मला खूप आवडतात. ते माझे आयडॉल आहेत. माझं सातत्याने त्यांच्याशी बोलणं होत नाही, पण जेव्हा केव्हा आम्ही भेटतो, तेव्हा ते काळजीपूर्वक चौकशी करत असतात. त्यांना जर काही सांगायचं असतं तेव्हा ते स्वत: तुमच्याशी येऊन बोलतील. सलमान सर सलमान सर आहेत. त्यांना माहीत असतं कोणाचं काय सुरू आहे. कोणी अडचणीत असेल तर ते मदत करतात”.