Palash Muchhal Reacts to 40 lakh fraud allegations : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाबरोबरचं लग्न मोडल्यानंतर दोन महिन्यांनी संगीतकार पलाश मुच्छाल वादात अडकला आहे. पलाश मुच्छलने सांगलीतील विज्ञान माने यांची ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असा आरोप आहे. आता पलाशने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. हे आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही, असं त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलंय.
पलाश मुच्छलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, “सांगलीतील विज्ञान माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत.”
“हे सर्व खोटे आरोप माझी प्रतिष्ठा मलिन करण्याच्या हेतूने लावण्यात आले आहेत. मी त्यांच्या सर्व आरोपांना कायदेशीररित्या आव्हान देणार आहे. माझे वकील श्रेयांश मिथारे, या प्रकरणी कायदेशीर मार्गाने त्यांना उत्तर देतील. या प्रकरणी कायदेशीर मार्गांनी कठोर कारवाई केली जाईल,” असंही पलाश मुच्छलने स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
पीटीआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ३४ वर्षीय अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने यांनी पलाश मुच्छलवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. विज्ञान यांनी मंगळवारी सांगली पोलीस अधीक्षकांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज सादर केला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पलाश आणि विज्ञान यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी सांगलीत भेट झाली होती. विज्ञान चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक होते. त्यांना पलाशने सांगितले की, तो ‘नजरिया’ नावाचा एक चित्रपट करत आहे. त्यासाठी निर्माता म्हणून विज्ञान काम करू शकतात. पलाशने विज्ञान यांना आश्वासन दिलं होतं की, सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १२ लाख रुपयांपर्यंत परतावा मिळेल. त्याने विज्ञान यांना चित्रपटात भूमिकेची ऑफरही दिली होती. स्मृतीच्या वडिलांनी पलाशबरोबर ओळख करून दिली होती, असा दावा माने यांनी केला आहे.
पलाश व विज्ञान त्यानंतर दोन वेळा भेटले. मग विज्ञान यांनी मार्च २०२५ पर्यंत पलाशला एकूण ४० लाख रुपये दिले. पण तो चित्रपट पूर्ण झालाच नाही. विज्ञान यांनी गुंतवलेले पैसे परत मागितल्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणात अद्याप कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही आणि पोलीस सध्या प्राथमिक चौकशी करत आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.
