Pankaj Tripathi Brother Bijendra Nath Tiwari Attacked in Gopalganj Bihar: बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बेलसंड येथे पंकज त्रिपाठी यांचे मोठे भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. जमिनीच्या जुन्या वादातून आणि वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात बिजेंद्र तिवारी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (PMCH) दाखल करण्यात आले आहे. गोपालगंज पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
पंकज त्रिपाठी यांचे मोठे भाऊ बिजेंद्र नाथ तिवारी यांच्यावर रविवारी रात्री बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावात हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या हल्ला प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बिजेंद्र यांच्यावर हल्ला नेमका का झाला, त्याच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ल्यानंतर बिजेंद्र नाथ तिवारी यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं, पण नंतर पुढील चांगल्या उपचारांसाठी त्यांना पाटण्याला नेण्यात आलं.
आरोपीला अटक
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार जमिनीच्या जुन्या वादातून आणि वैमनस्यातून हा हल्ला झाला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गोपालगंजचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांनी सांगितलं की, आरोपीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली व त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
बिजेंद्र नाथ तिवारी हे पंकज त्रिपाठी (त्यांचे मूळ नाव पंकज तिवारी आहे) यांचे मोठे भाऊ आहेत. पंकज त्रिपाठी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आहेत. ते मूळचे बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावचे रहिवासी आहेत. पंकज त्रिपाठी हे पंडित बनारस तिवारी आणि हेमवंती तिवारी यांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान आहेत. बिजेंद्र तिवारी हे शेतकरी असून त्यांच्या मूळ गावात अत्यंत साधे जीवन जगतात. त्यांचे कुटुंब फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून पूर्णपणे दूर आहे आणि गावात राहून शेती करतं.
शाळेत असताना पंकज यांनी ‘त्रिपाठी’ हे आडनाव लावायला सुरुवात केली होती. ते ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे माजी विद्यार्थी आहेत. २००४ मध्ये तिथून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं. गेल्या काही वर्षांत पंकज त्रिपाठींना ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘स्त्री’, ‘मिर्झापूर’, ‘क्रिमिनल जस्टीस’ आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपट व वेब सीरिजमधील आपल्या भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
आता पंकज त्रिपाठी यांच्या भावावर हल्ला झाला. २ वर्षांपूर्वी २०२४ मध्ये झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात एका कार अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचे निधन झाले. तर, त्यांची बहीण सविता तिवारी यांना दुखापत झाली होती.
