Pankaj Tripathi Ohh My Dog Movie Review: आज शुक्रवारी (१४ ऑगस्ट) बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा ‘बंटवारा १९४७’ आणि इम्रान हाश्मीचा ‘आवारापन २’ हे मोठे चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. पण याच गोंधळात पंकज त्रिपाठी यांचा सस्पेन्स आणि इमोशन्सने भरलेला मिस्ट्री थ्रिलर चित्रपट थिएटर्समध्ये प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवत आहे. ‘ओह माय गॉड २’ चे दिग्दर्शक अमित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला आयएमडीबीवर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनीही या चित्रपटाचे कौतुक करत “मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वात उत्तम चित्रपट आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकज त्रिपाठी यांच्या या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाचे नाव ‘ओह माय डॉग’ (Ohh My Dog) आहे. ७ ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर राजेश कुमार आणि पवन मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ओह माय गॉड २’ चे दिग्दर्शक अमित राय यांनी केले आहे.
आयएमडीबीवर मिळाले ८.५ रेटिंग
सस्पेन्स आणि इमोशन्सनी भरलेला पंकज त्रिपाठी यांचा हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले आहे. महत्त्वाचं म्हणजे आयएमडीबीवर या चित्रपटाला ८.५ चे रेटिंग मिळाले आहे.
मेनका गांधींनी केले ओह माय डॉग सिनेमाचे कौतुक
ओह माय डॉग चित्रपटाची कथा फक्त मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेली नसून ती मुक्या प्राण्यांचं आणि माणसाचं सुंदर नातं संवेदनशीलतेने मांडते. याच कारणामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी कार्यकर्त्या मेनका गांधी यांनीही या चित्रपटाची खूप कौतुक केलं आहे.
“मी आतापर्यंत जितके चित्रपट पाहिले आहेत, त्यापैकी हा सर्वात उत्तम चित्रपट आहे. यात प्रत्येक सीनमध्ये सत्य परिस्थिती दिसून येते. ईशान्य भारतातून प्राण्यांची नागालँडमध्ये कत्तलीसाठी कशी वाहतूक केली जाते, ते या चित्रपटात अतिशय स्पष्टपणे दाखवलं आहे. तसेच किडनी रॅकेटवरही चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला आहे. हा असा चित्रपट आहे ज्याला स्टार्सची गरज नाही, पण तरीही हा कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला आहे,” असं मेनका गांधी ‘लाईव्ह हिंदुस्थान’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
