बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या आई-वडिलांबरोबर, मुलांबरोबर काम केलं आहे. अशातच आता यामध्ये अजून एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. आपल्या विविध भूमिकांमुळे प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणारे परेश रावल यांनी त्यांच्या मुलाबरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
परेश रावल आणि त्यांचा मुलगा आदित्य रावल यांच्यासाठी ‘पास्ट टेन्स’ हा चित्रपट खास ठरला आहे, कारण पहिल्यांदाच दोघेही एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीला या चित्रपटासाठी आदित्यला ऑफर मिळाली होती आणि परेश रावल या प्रोजेक्टचा भाग नव्हते. मात्र, अनंत महादेवन यांनी चित्रपटाची कथा सांगितल्यानंतर परेश रावल इतके प्रभावित झाले की, आपण या चित्रपटाचा भाग होण्यासाठी जवळपास नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळं पाऊल उचललं असं त्यांनी सांगितलं. आदित्यच्या करिअरला सध्या चांगली गती मिळत असताना पहिल्यांदाच वडिलांबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं त्याच्यासाठीही खास आहे. या चित्रपटाचा २१ ऑगस्ट रोजी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये प्रीमियर झाला.
परेश रावल-आदित्य रावल पहिल्यांदाच झळकणार एकत्र
परेश रावल यांना अनंत महादेवन दिग्दर्शित ‘पास्ट टेन्स’मध्ये तुम्ही सुरुवातीला नव्हता. हा चित्रपट आदित्यला ऑफर झाल्यानंतर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला? असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “आदित्य या चित्रपटात नसता तरी मी या कथेचा भाग झालो असतो, कारण ही कथा खूपच उत्तम आहे. ती खूप वेगळी, माणुसकीशी जोडलेली आणि भावनिक आहे, शिवाय हा एक थ्रिलरही आहे. यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनंत महादेवन. मला अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडतं, ज्याला स्वतःवर आणि आपल्या कामावर पूर्ण विश्वास असतो. कोणताही दिखावा नाही, नखरे नाहीत, आपल्या पदाचा किंवा अनुभवाचा गैरवापर नाही, उलट तो पूर्ण आत्मविश्वासाने आणि उत्तम तयारीनिशी काम करतो. मी त्यांच्याबरोबर ‘द स्टोरीटेलर्स’ हा चित्रपट केला आहे. सत्यजित रे यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट मला माझ्या ४० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीनंतर मिळाला होता. त्यामुळे ही संधीही माझ्यासाठी देवाने दिलेल्या संधीसारखीच होती आणि मला ती हातची जाऊ द्यायची नव्हती. या संधीसाठी मी खूप आभारी आहे.”
पुढे त्यांना मुलगा आदित्यबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचं समजल्यावर काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “हो, मी नक्कीच उत्सुक होतो. पण त्याच वेळी असंही होतं की, तुम्ही वडील असता, त्यामुळे मुलांवर आधीच थोडा दबाव असतो आणि त्यानंतर ते तुमच्याबरोबर अभिनयही करत असतात. माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की मी माझी भूमिका उत्तम प्रकारे साकारावी, पण त्याच वेळी माझं व्यक्तिमत्त्व किंवा माझ्या उपस्थितीमुळे त्याला काम करणं कठीण जाऊ नये. पण आदित्य खूप चांगला अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या मनातही असा विचार नव्हता आणि माझ्याही मनात नव्हता. त्यामुळे सगळं अगदी सहजपणे घडून गेलं”.
परेश रावल म्हणाले, “मला एक सीमारेषा आखावीच लागते. कारण मी त्याच्याबद्दल जास्त विचार करू लागलो, तर गोष्टी बिघडू शकतात. जेव्हा मी त्याच्याबरोबर नसतो आणि त्याचं काम दूरून पाहत असतो, तेव्हा तो हे कसं करतोय, त्याचं काम योग्य आहे की नाही, याचा विचार करू शकतो. त्याने ती भूमिका कशी साकारली किंवा कुठे काही सुधारणा करता येईल, याबाबत मी माझा फीडबॅकही देऊ शकतो. पण आदित्य खूप समतोल विचारी आणि मेहनती मुलगा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अनंत महादेवन यांच्या सुरक्षित हातात आहे. काही चूक असेल तर अनंतजी त्याला सांगतील. त्यामुळे मी माझी मर्यादा ओलांडून त्याच्यासाठी अतिरिक्त दिग्दर्शक बनणं योग्य ठरणार नाही. तसं करणं योग्य नाही.”
