Paresh Rawal on Kapil Sharma Show: परेश रावल सध्या ‘भूत बंगला’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा उत्तम कमाई करत आहे. चार दिवसांत या सिनेमाने जगभरात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
आता परेश रावल त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच ‘मनी कंट्रोल’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी कॉमेडी चित्रपटांना टेलिव्हिजन आणि ओटीटीवरील शो यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. विशेषत: द कपिल शर्मा शोबरोबर स्पर्धा करावी लागत आहे, असे वक्तव्य केले. तसेच, त्यांनी सुनील ग्रोव्हरचे कौतुक केले. त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे, असे ते म्हणाले.
“कपिल शर्मा शो…”
परेश रावल म्हणाले, “तुम्ही जर कपिल शर्मा शो पाहत असाल, तर तिथे खूप टॅलेंट असणारे कलाकार आहेत. सुनील ग्रोव्हर प्रतिभावान कलाकार आहे. त्या सर्वच कलाकारांकडे टॅलेंट आहे. अशा कॉमेडीबरोबर तुम्हाला स्पर्धा करायची असेल, तर तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागतो. नाही तर लोकांना चित्रपट आवडत नाहीत. विनोद लिहिणे आणि त्यात सातत्य ठेवणे, हे फार कठीण काम आहे. कपिल शर्माच्या शोमध्येसुद्धा जेव्हा विनोदांचे लेखन होते, तेव्हा त्यांची १०-१५ लोकांची टीम असते. चित्रपटात एक लेखकाला कामाला ठेवण्यापुरते निर्मात्याकडे पैसे नसतात, तर १५ लोकांना कुठून पैसे देणार?”
पुढे ते म्हणाले, “हा काळ कॉमेडीसाठी अत्यंत कठीण काळ आहे. प्रत्येक दिवशी स्पर्धा करावी लागते. प्रत्येक विनोदी चित्रपटाला कपिल शर्मा शोबरोबर स्पर्धा करावी लागते. कधी कधी ते अतिशयोक्तीही करतात; पण तरीसुद्धा ते चित्रपटांसाठी एक स्पर्धा आहेत. ते विनोदाचा एक दर्जा निश्चित करीत आहेत.
दी ग्रेट इंडियन कपिल शो या शोचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसतात. कपिल शर्मा शोचा सूत्रसंचालक आहे.
सुनील ग्रोव्हरने त्याच्या परफॉर्मन्समधून सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने अनेकांची मिमिक्री केली आहे. त्यामध्ये आमिर खान, अजय देवगण, गुलजार, एस. एस. राजामौली, सलमान खान अशा अनेकांची त्याने मिमिक्री केली आहे. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही, तर कलाकारांकडूनदेखीलअभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. या शोमध्ये अनेक कलाकार, नामांकित व्यक्ती मुलाखतीसाठी येतात.
परेश रावल यांच्या भूत बंगला या सिनेमाबद्दल बोलायचे, तर हा सिनेमा प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामध्ये वामिका गब्बी, मिथिला पालकर, तब्बू, राजपाल यादव, असरानी हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत.
