Hera Pheri 3 Paresh Rawal Exit: ‘हेरा फेरी’, ‘हेरा फेरी २’ हे दोन्ही सिनेमे प्रचंड गाजले. कलाकार, त्यांचा अभिनय, कॉमेडी, अॅक्शन या सगळ्यामुळे सिनेमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सुनील शेट्टी, परेश रावल आणि अक्षय कुमार यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. विशेष म्हणजे सिनेमातील डायलॉगही गाजले. या सगळ्यामुळे या कलाकारांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.

‘हेरा फेरी ३’ या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘हेरा फेरी ३’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर परेश रावल यांनी या सिनेमातून एक्झिट घेतल्याचे समोर आले. त्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.

परेश रावल यांनी पुन्हा सोडला ‘हेरा फेरी ३’?

या सगळ्यानंतर परेश रावल सिनेमात काम करणार असल्याचे म्हटले गेले. मात्र, आता पुन्हा एकदा परेश रावल यांनी या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलीवूड हंगामानुसार, परेश रावल यांनी चित्रपटाची सायनिंग अमाउंट परत केली आहे. इतकेच नाही तर त्यावर १५ टक्के व्याजही दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परेश रावल यांचे १५ कोटी इतके एकूण मानधन होते. या करारानुसार, त्यांना उर्वरित रक्कम, १४.८९ कोटी रुपये, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बरोबर एका महिन्याने मिळणार होती, हे परेश रावल यांना मान्य नव्हते.

रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी ३’चे अनाउन्समेंट टीझरचे शूटिंग ‘भूत बंगला’च्या सेटवरच झाले आहे. असे असले तरीही परेश रावल यांनी चित्रपट सोडल्याबद्दल किंवा चित्रपटाच्या शूटिंगबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने ‘हेरा फेरी ३’बद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता, “अजून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नाही. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर मला स्वत:ला धक्का बसला होता. अजून एक वर्षभर तरी सिनेमाचे शूटिंग सुरू होणार नाही. त्याच्या संदर्भात खूप अडचणी आहेत. पण, आम्ही तिघे एकत्र आहोत.”

दरम्यान, ‘हेरा फेरा ३’मुळे वाद झाल्यानंतर अक्षय कुमार व परेश रावल यांनी ‘भूत बंगला’ या सिनेमात एकत्र काम केले. त्यांना स्क्रीनवर एकत्र पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच, या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये तब्बू, वामिका गब्बी, मिथिला पालकर, असरानी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. आता ‘हेरा फेरी ३’बद्दल निर्माते अधिकृतपणे कधी सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.