Paresh Rawal on Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते पोस्ट करून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. अनेकदा ते त्यांचे विचार, अनुभव आणि सिनेविश्वातील आठवणी शेअर करत असतात. अनेकदा ते पहाटे ४ वाजता पोस्ट करीत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सूचक पोस्ट केली होती. अवघ्या काही शब्दांच्या त्यांच्या या पोस्टमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते, “काहीतरी बोलायचे होते पण विचार केला – नको!! ते बोलायला नको.” अशी पोस्ट केली होती. यावरून त्यांना काय बोलायचं होतं याची चर्चा रंगली होती. यावर आता अभिनेते परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी विकी लालवानीला मुलाखत दिली असून यामध्ये सिनेविश्वातील अनुभव सांगितले आहेत. परेश यांनी बॉलीवूड, राजकारण आणि अमिताभ बच्चन यांच्याबाबत मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांना काही चित्रपटांतून कोणतेही कारण न सांगता काढून टाकले असल्याचा खुलासा परेश यांनी केला आहे; तर काही चित्रपटांना ते स्वतः नकार कळवतात, असे परेश रावल यांनी सांगितले.

या वयात अमिताभ बच्चन आणखी काय करणार? – परेश

परेश रावल म्हणाले, “लोक आता बोलायला घाबरतात. त्यांना सत्तेतील लोकांकडून त्रास होण्याची भीती वाटते. पूर्वी काही लोक निर्भीडपणे बोलायचे, पण आता अशा लोकांची संख्या कमी झाली आहे.” अमिताभ बच्चन यांच्याबाबत परेश म्हणाले, “या वयात अमिताभ बच्चन आणखी काय करणार? व्ही. पी. सिंह प्रकरणानंतर त्यांना ज्याप्रकारे टार्गेट करण्यात आलं, याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला आहे. सत्ता तुमच्या विरोधात गेली तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अमिताभ यांनी काय-काय सहन केलं हे आपल्याला पूर्णपणे माहिती नाही, त्यांनी खूप त्रास सहन केला आहे.

पुढे ते म्हणाले, अमिताभ बच्चन हे वाद घालणारे व्यक्ती नाहीत. त्यांना शांततेत राहणं आवडतं. ते हात जोडून तिथेच वाद संपवतात. अनेकजण हा त्यांचा कमकुवतपणा समजतात, पण त्यांना भांडण, वाद आणि नकारात्मकता अजिबात आवडत नाही.”

यावेळी परेश रावल यांनी ‘१०२ नॉट आऊट’ चित्रपटाबाबतही मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “राजकारणामुळे मला चित्रपट मिळणं कधीच कमी झालं नाही. मी स्वतः अनेक चित्रपट करण्यास नकार दिला होता. मी ‘नकार दिला’ हा शब्द मुद्दाम वापरतो. अनेकदा पटकथा किंवा कथा मला योग्य वाटत नव्हती. राजकारणात असतानाही माझ्याकडे चित्रपटांसाठी भरपूर वेळ होता. संसद वर्षातून सुमारे ११० दिवस चालते. उरलेले २६५ दिवस माझ्याकडे असायचे, मी माझे नाटकांचे प्रयोगही कमी केले होते.”

एका व्यक्तीला माझ्याबरोबर काम करायचं नव्हतं – परेश रावल

पुढे ‘१०२ नॉट आऊट’ चित्रपटातून अचानक बाहेर काढण्यात आल्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, “‘१०२ नॉट आऊट’मध्ये ऋषी कपूर यांनी साकारलेली भूमिका सुरुवातीला मी करणार होतो. जवळपास दोन ते तीन वर्षे मी त्या प्रकल्पाशी जोडलेलो होतो. मात्र, अचानक मला चित्रपटातून बाहेर करण्यात आलं. मी उमेशला याचं कारण विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की, एका व्यक्तीला माझ्याबरोबर काम करायचं नव्हतं. त्या व्यक्तीचं नाव त्यानं मला कधीच सांगितलं नाही. आजही मला नेमकं कारण माहीत नाही, मात्र याचा माझ्या राजकीय कारकिर्दीशी काहीही संबंध नव्हता.”