Paresh Rawal on Akshay Kumar: परेश रावल हे भूत बंगला या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रियदर्शन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

भूत बंगला सिनेमात कॉमेडी तर पाहायला मिळतेच पण काही सीन पाहून भीतीही वाटते. या सिनेमात परेश रावल, राजपाल यादव, मिथिला पालकर, तब्बू, वामिका गब्बी, अक्षय कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

प्रियदर्शन व अक्षय कुमार हे १६ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांनी गरम मसाला, भूल भुलैय्या, हेरा फेरी, हंगामा, हंगामा २, भागम भाग अशा चित्रपटांत काम केले आहे. त्यांचे हे सिनेमे प्रचंड गाजले आहेत. तसेच, तब्बू व अक्षय कुमारदेखील २५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

परेश रावल यांनी नुकताच पीटीआयशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “या टीमबरोबर पुन्हा काम करताना मजा आली. काही गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता, त्यापैकीच हा एक चित्रपट आहे. अशा लोकांबरोबर काम केल्यामुळे हा प्रवास उत्तम होतो.” पुढे ते मजेशीरपणे असेही म्हणाले की अशा लोकांच्या सहवासामुळे आरोग्य उत्तम राहतं.

ज्या ठिकाणी भूत बंगला सिनेमाचे शूटिंग झाले. त्याच ठिकाणी भुल भुलैय्या या सिनेमाचे २००७ मध्ये शूटिंग झाले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी शूटिंग करताना खूप आठवणी जाग्या झाल्याचेही परेश रावल यांनी सांगितले.

परेश रावल भूत बंगला सिनेमाबद्दल असेही म्हणाले, “या चित्रपटात ज्या ठिकाणी भूत राहते, तिथे लग्न होते. त्यामुळे काय घडू शकते, याची तुम्ही कल्पना करू शकता. तुम्ही असा सुंदर हॉरर चित्रपट अजून पाहिला नसेल.”

प्रियदर्शन यांच्याबद्दल परेश रावल म्हणाले…

दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल परेश रावल म्हणाले, “त्याच्यासारखे दिग्दर्शक मी कमी पाहिले आहेत. जर त्याने सांगितलं की शूटिंग १० दिवसांत होणार आहे. तर ९ दिवसांत शूटिंग पूर्ण होते. तो अशा दिग्दर्शकापैकी एक आहे, ज्याला त्याच्या कामाची स्पष्टता आहे. अशा व्यक्तीपासून खूप वर्षे दूर राहणे चांगली गोष्ट नाही. जेव्हा मी सेटवर आलो, तेव्हा खूप मजा केली.”

अक्षय कुमारच्या मैत्रीबद्दल परेश रावल म्हणाले…

हेरा फेरी ३ या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर परेश रावल यांनी चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर अक्षय कुमार व त्यांच्यात वाद झाला होता. अक्षय कुमारने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. काही दिवसानंतर परेश रावल यांनी हेरा फेरी ३ मध्ये काम करणार असल्याचे सांगितले होते. आता या सगळ्या वादानंतर त्यांच्यातील मैत्रीचे नाते आजही तसेच आहे का, असे विचारले. त्यावर परेश रावल म्हणाले, “त्या गोष्टी मैत्रीबद्दल नव्हत्या. आमच्यातील मैत्रीवर कधीच कोणता डाग असणार नाही. पण, कधी कधी गोष्टी घडतात. काही वेळा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना गृहित धरता. पण, आमच्यात कोणतेही वैर नाही.”

दरम्यान, या वादानंतर परेश रावल व अक्षय कुमार भूत बंगला या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा १६ एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.