Paresh Rawal Reacts National Film Awards Gujarat Controversy: यंदाचा ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा राजधानी दिल्लीमध्ये न करता गुजरातमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी दिल्लीमध्ये या सोहळ्याचे आयोजन केले जाते, पण यावर्षी एकता नगर (केवडिया) इथे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा होणार असल्याचे जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय नेत्यांनी आणि सिनेविश्वातील काही कलाकारांनी आक्षेप घेतला. या प्रकरणावर ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी प्रतिक्रिया देत गुजरात हे काय पाकिस्तानमध्ये आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये परेश रावल यांनी ७२ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात हेसुद्धा देशातील अविभाज्य राज्य असून तिथे सोहळा आयोजित करण्यामध्ये काहीही चुकीचे नसल्याचे मत परेश रावल यांनी व्यक्त केले.

गुजरात हे पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये आहे का? – परेश रावल

परेश रावल म्हणाले, गुजरात हे राज्य काय बांगलादेशमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये आहे का? तो आपल्याच देशाचा एक अविभाज्य भाग आहे. मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कार्यक्रम गुजरातमध्ये का होऊ नये? गुजरातमध्येही असे कार्यक्रम व्हायला हवेत… माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक राज्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत, त्यात काहीच चुकीचे नाहीये.”

पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनावरून राजकीय नेत्यांमध्ये वाद सुरू आहेत. विरोधातील पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत विचारले असता परेश रावल म्हणाले, “प्रश्न विचारणे हे तर राजकारण्यांचे कामच आहे, यामध्ये काहीही चुकीचे नाही असे मला वाटते.”

दिल्लीतील कार्यक्रमाबाबत परेश रावल म्हणाले, “२६ जानेवारीला होणारी परेड ही तर दिल्लीमध्येच होते ना…तर हे कार्यक्रम इतर राज्यांमध्ये झाले पाहिजेत. यामध्ये काय वाईट आहे? गुजरात हा आपल्या देशाचा भाग नाहीये का? गुजरात राज्यसुद्धा आपल्याच देशात आहे.”

नेमका वाद काय?

राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आत्तापर्यंत हा सोहळा देशाची राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केला जात होता. १९५४ मध्ये पहिले राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीतील विज्ञान भवनात प्रदान करण्यात आले होते, तेव्हापासून आतापर्यंत तिथेच दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. ७२ वर्षांनंतर आता कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले असून ७२ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला आहे.मात्र, यामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून काही राजकारण्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते निर्माते राहुल ढोलकिया यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. “पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर नेण्यास माझी हरकत नाही, पण त्यासाठी गुजरातच का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.