Paresh Rawal reveals Theatre owners banned him: बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणून परेश रावल यांची ओळख आहे. परेश रावल यांनी आजवर अनेक चित्रपट, तसेच नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात संतापाच्या भरात अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्यांच्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागले.
“तेव्हा मी स्वत:ला थांबवू शकलो नाही…”
परेश रावल यांनी नुकतीच राज शमानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एक घटना सांगितली. “प्रतिशोध या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटक सुरू असतानाच प्रेक्षकांमधील एक व्यक्ती सतत अश्लील टिप्पण्या करीत होती.”
“मी स्टेजवरून खाली उतरलो. प्रेक्षकांमध्ये घुसलो आणि त्या व्यक्तीला मारहाण केली. तेव्हा मी स्वत:ला थांबवू शकलो नाही. जिथून आवाज येत होता, त्या दिशेने मी गेलो. कोणीतरी सतत अश्लील कमेंट करीत होते. त्या घटनेवरून खूप गोंधळ उडाला. अर्थातच, त्या दिवशी नाटक बंद पडले. थिएटर मालकांनी सांगितले की, परेशला परत इथे सादरीकरण करू देणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “मी त्या व्यक्तीला फार मारलं नाही. मी त्याला तीन-चार वेळाच मारलं असेन. कारण-मी गर्दीत गेलो होतो. त्याचा परिणाम उलटही झाला असता.”
“पण आमच्यात मैत्री झाली…”
परेश रावल यांनी त्याच मुलाखतीत एका व्यक्तीला त्यांनी दगड मारला होता, असा खुलासादेखील केला. त्याबद्दल ते म्हणाले, “मला माझ्या कृतीचा पश्चात्ताप झाला. त्यानंतर मी त्या व्यक्तीच्या घरी गेलो. त्यानंतर आम्ही एकमेकांचे मित्र झालो. फार चांगले मित्र नाही; पण आमच्यात मैत्री झाली.”
जेव्हा माणूस दुखावला जातो, तेव्हा त्याला राग येतो. रागवण्याचं मूळ कारण हे दुखावलं जाणं असतं. हिंदी चित्रपटात राग ही भावना फार वरवरची दाखवली जाते, असेही परेश रावल म्हणाले.
परेश रावल यांनी खुलासा केला की, त्यांच्या वडिलांना पटकन राग येत असे. त्यांचं रागावणं थोडं हिंसक असे. परेश रावल असेही म्हणाले की, समाजात लोकांना राग येण्याचं प्रमाण वाढलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही, तुमच्या आयुष्यात जेव्हा अस्थिरता असते, तेव्हाही राग येऊ शकतो. मीसुद्धा कोणीतरी आहे, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची असते, तेव्हाही रागाची भावना उत्पन्न होते. दुखावण्याची आणि रागावण्याची एक फॅशन आहे. त्यांना हा एक विशेषाधिकार वाटतो आणि ते त्याचा फायदा घेऊ इच्छितात. काही लोकांकडे कारणही असू शकते”, असेही परेश रावल यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
परेश रावल असे म्हणाले, “आजकाल अनेकांकडून रागाचा संबंध हा धर्माशी जोडला जातो. २००९ च्या संगम या चित्रपटात एक डायलॉग आहे की, ते कुठल्याही गोष्टी धर्माशी जोडतात. धर्माचं नाव पुढे करतात. कारण- ते एक चांगले शस्त्र आहे. जर तुम्ही धर्माचा उल्लेख केला, तर १०-१५ लोक संतप्त होतील. जर मी ब्राह्मण, दलित, मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणून बोललो, तर मला झेंडा फडकवणारे अधिक सहकारी सापडतील. हे खूप सोपं आहे. हे बुलेटप्रूफ जॅकेटसारखं आहे.” आता तुम्ही मला हात लावू शकत नाही, असे म्हणत लोक धर्माचा वापर करतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
