Paresh Rawal Son Aniruddha Rawal Aawarapan 2 Debut : बॉलीवूडचा एक काळ गाजवलेला लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ हा सिनेमा तुफान कमाई करीत असून, प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाची गोष्ट आणि त्यातील गाणीही प्रेक्षकांना आवडली आहेत. ‘आवारापन २’ सिनेमामध्ये दिग्गज अभिनेते परेश रावल यांच्या मुलानेही भूमिका साकारली आहे.

अनिरुद्ध रावलचे पदार्पण

दिग्गज अभिनेते परेश रावल यांचा मुलगा अनिरुद्ध रावलने ‘आवारापन २’मधून सिनेविश्वामध्ये दमदार पदार्पण केले आहे. अनिरुद्धने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर भूमिका साकारली असली तरी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘आवारापन २’ सिनेमामध्ये अनिरुद्ध रावलने ‘सिकंदर’ नावाच्या ऑटिझम असलेल्या मुलाची भूमिका साकारली आहे. तर दिशा पाटनीने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. जन्मापासून ऑटिझम असलेल्या सिकंदरचे त्याची बहीण गुंडांपासून रक्षण करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शांत, साध्या स्वभावाच्या आणि हिंसाचारापासून दूर असलेल्या व्यक्तीचे पात्र अनिरुद्धने साकारले आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्याकडून अभिनयाचे धडे

अनिरुद्ध रावल हा परेश रावल आणि अभिनेत्री स्वरूप संपत यांचा मुलगा आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने काही चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘सुलतान’ व ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांच्या निर्मितीदरम्यान त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. आता इमरान हाश्मीच्या ‘आवारापन २’ सिनेमामध्ये तो झळकला आहे.

अनिरुद्ध रावलचा ‘आवारापन २’ हा मोठ्या पडद्यावरील पहिला सिनेमा असला तरी यापूर्वी त्याने २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर आलेल्या स्कूप या शोमध्ये काम केले होते. सोशल मीडियावर सक्रिय नसलेल्या अनिरुद्ध रावलच्या अभिनयाचे कौतुक केले जात असून, पहिल्याच सिनेमामध्ये त्याने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

परेश रावल यांचे कुटुंब

दरम्यान, इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘आवारापन २’ हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या क्राईम-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’चा हा सीक्वेल आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, केवळ सहा दिवसांमध्ये त्याने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.