बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १३ मे ला परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान दोघांच्या लग्नाच्या विधींची तारीख आणि वेळ समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहेत. राघव आणि परिणीती यांचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार आहे. २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील.
रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका समोर
काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका समोर आली होती. इन्सटंट बॉलिवूडने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राघव चड्ढा यांच्या लग्नाचे रिसेप्शन कुठे होणार याचं आमत्रंण समोर आले आहे. ही आमंत्रण पत्रिका फारच सुंदर आहे. या पत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची नाव लिहिण्यात आली आहेत. त्याखाली राघव आणि परिणीती हे नाव पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच परिणीतीच्या आई-वडिलांचेही नाव दिसत आहे. परिणीती आणि राघव यांचे लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण पत्र पांढऱ्या रंगात पाहायला मिळत आहे. त्यावर सोनेरी रंगाची डिझाईन आहे.
असे असतील लग्नाची विधी
२३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता परिणीतीच्या बांगड्या (चूडा) कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता परिणीती आणि राघव यांचा संगीताचा कार्यक्रम आहे. २४ सप्टेंबरला म्हणजे लग्नाच्या दिवशी दुपारी १ वाजता राघव यांची सेहराबंदी असेल. दुपारी २ वाजता राघव यांची घोड्यावरुन वरात काढण्यात येणार आहे. ३.३० वाजता जयमाला आणि ४ वाजता सप्तपदी. संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येईल. आणि रात्री ८.३० वाजता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.
साखरपुड्यापूर्वी बरेच महिने परिणीती व राघवच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.
परिणीती चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘उंची’ चित्रपटात दिसली होती. आता ती अमर सिंग चमकीला यांच्या बायोपिक ‘चमकिला’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले असून यामध्ये परिणीतीसोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. ‘चमकिला’ पुढील वर्षी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.