Saina Nehwal Clarifies Her Equation With Parineeti Chopra : बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक चरित्रपट प्रदर्शित झाले. यापैकीच एक म्हणजे ‘सायना.’ बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर हा चित्रपट आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली. अशातच आता स्वत: सायनाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेला आणि अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला. परंतु, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यातील परिणीतीच्या कामाचं कौतुक झालेलं. गेल्या महिन्यात परिणीती चोप्राने सायना नेहवालला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. परिणीतीने अनफॉलो केलं असलं तरी सायना तिला फॉलो करत होती. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सायनाने याबद्दल सांगितलं आहे.

सायनाने यावेळी तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि यामुळे तिला फारसा फरक पडत नाही असं म्हटलं आहे. यावेळी परिणीती आणि तिच्यामध्ये कधीच मैत्री नव्हती असंही म्हटलं आहे. सायनाने विकी ललवाणीशी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. सायना नेमकं काय म्हणाली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

परिणीती चोप्राबद्दल सायना नेहवाल काय म्हणाली?

सायना म्हणाली, “मला तर तिने अनफॉलो केलं आहे याबद्दलही माहिती नव्हती. मला असं वाटतं की ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत होती आणि एकदा चित्रपट बनल्यानंतर ती दुसऱ्या कामाकडे लक्ष केंद्रित करत असेल.” सायनाने सांगितलं की, चित्रपटासाठी परिणीतीने तिच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं; मात्र वेळेअभावी दोघींमध्ये मैत्री निर्माण होऊ शकली नाही. मैत्री होण्यासाठी पुरेसा वेळ असावा लागतो, असंही सायनाने यावेळी म्हटलं आहे.

सायना म्हणाली, “मैत्री निर्माण होण्यासाठी खूप वेळ असावा लागतो. पण, आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता; कारण चित्रपट लवकर प्रदर्शित होणार होता. आम्ही दररोज भेटत नव्हतो. मी तिला बॅडमिंटन कोर्टवर कसं खेळतात, कशा मुव्हमेंट असतात हे शिकवलेलं. तिने कदाचित माझ्या स्वभावाचं निरीक्षणही केलं. तिने खूप मेहनत घेतली आणि खूप चांगलं काम केलं. चित्रपट पाहताना मी खूप भावूक झाले होते.”

परिणीतीच्या अनफॉलो करण्याबद्दल सायना म्हणाली, “कोण तुम्हाला फॉलो करतं आणि कोण अनफॉलो करतं हे फार म्हत्त्वाचं नसतं. आमच्यामध्ये कुठलाही वाद नव्हता.” परिणीतीचं कौतुक करत सायना पुढे म्हणाली, “ती खूप लक्ष केंद्रित करून काम करत होती. बॅडमिंटन शिकायला वर्ष लागतं, परंतु ती चार महिन्यांतच शिकली. दिग्दर्शक अमोल गुप्ते मला तिची तालीम करतानाचे व्हिडीओ पाठवायचे.”

श्रद्धा कपूरला होती पहिली पसंती

सायनाला मुलाखतीत पुन्हा चित्रपट बनला तर त्यात कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला असं वाटतं श्रद्धा कपूर खूप चांगलं काम करेल. खरंतर तीच या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. आम्ही अजूनही संपर्कात आहोत आणि मी तिला अनेकदा भेटले आहे. ती खूप गोड मुलगी आहे. तिने चित्रपटासाठी होकार दिलेला, परंतु तिला डेंग्यु झाल्यामुळे यातून बाहेर पडावं लागलं.”