Patralekha reply to trolls on weight gain : अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या वजनावरुन, दिसण्यावरुन, कपड्यांवरुन तर कधी त्यांच्या मेकअपमुळेसुद्धा ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो, व्हिडीओंवर अनेक जण वाटेल तसं लिहित असतात. काही वेळा काही अभिनेत्री याला प्रत्युत्तर देतात तर काही दुर्लक्ष करतात. अशातच आता अभिनेत्री पत्रलेखा हिने याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

पत्रलेखा व राजकुमार राव या जोडीचा ‘टोस्टर’ हा चित्रपट नुकताच ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाला आहे. राजकुमार राव यामध्ये मुख्य भूमिकेत आहे तर पत्रलेखाने याची निर्मिती केली आहे. गरोदरपणानंतर अभिनेत्रीने मुलीचं संगोपन करण्याबरोबर दोन चित्रपटांची निर्मितीसुद्धा केल्याचं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५मध्ये राजकुमार राव व पत्रलेखा यांच्या मुलीचा पार्वतीचा जन्म झाला. पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर अनेकांनी या जोडीवर आई-बाबा झाल्यानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु, काहीवेळा मुलांच्या जन्मानंतर काही स्त्रियांचं वजन वाढतं, त्यांच्यामध्ये काही शारीरिक बदल होतात. असंच काहीसं पत्रलेखाच्या बाबतीतही झालं. पण, यामुळे तिच्यावर टीका झाल्यानंतर आता तिने ट्रोल करणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

पत्रलेखाने व्यक्त केला संताप

आई झाल्यानंतर पत्रलेखा पहिल्यांदाच स्पॉट झाली होती. मुलीच्या जन्मानंतर पत्रलेखाचं वजन वाढल्यामुळे तिला ट्रोल केलं होतं. ज्यावर आता तिने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. पत्रलेखाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तिला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. अभिनेत्री म्हणाली, “मला काय झालं आहे? मी नुकताच बाळाला जन्म दिला आहे. हो माझं वजन वाढलं आहे. जे तुम्हाला असामान्य वाटत आहे. पण, मी बसून खूप काही खाल्लं आहे असं काही नाहीये. मी नुकताच एका बाळाला जन्म दिला आणि त्याचबरोबर दोन चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे. या दोन्ही गोष्टी अजिबात सोप्या नाहीयेत.”

पत्रलेखा पुढे म्हणाली, “जर माझ्या हातात असलं असतं तर मी अशी झाले नसते. पण, गरोदरपणानंतर माझ्या शरीरात काही बदल झाले. निदान देवासाठी कृपया थोडं नम्रपणे वागायला शिका.”

पत्रलेखाची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, पत्रलेखाची निर्मिती असलेला व राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘टोस्टर’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी नुकताच ओटीटीवर रिलीज झाला आहे. यामध्ये हिंदी व मराठीतील  अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.