Pavan Malhotra on Kartik Aaryan,Randeep Hooda And Yami Gautam: ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘चंदू चँपियन’, ‘भुल भुलैय्या ३’ अशा अनेक सिनेमांतून अभिनेता कार्तिक आर्यनने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतीच ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चंदू चँपियन या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेता कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच, आर्टिकल ३७० साठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आता लोकप्रिय अभिनेते पवन मल्होत्रा यांनी ७२ व्या राष्ट्रीय पुरस्कार आणि विजेत्यांबाबत वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणालेत, याबद्दल जाणून घेऊ…
कार्तिक आर्यन व रणदीप हुड्डाबद्दल पवन मल्होत्रांचे वक्तव्य
पवन मल्होत्रा यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “चंदू चँपियन या सिनेमासाठी कार्तिक आर्यनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळायला हवा, तो त्यासाठी पात्र आहे. तो हुशार मुलगा आहे.” तसेच, ते असेही म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातून अभिनयासाठी रणदीप हुड्डाचादेखील गौरव व्हायला हवा होता. ते रणदीप हुड्डाबद्दल म्हणाले, “बेस्ट डेब्यूट डायरेक्टर म्हणून रणदीप हुड्डाला पुरस्कार मिळाला आहे. पण, मला वाटतं की, त्याच्या परफॉर्मन्सचेसुद्धा कौतुक व्हायला हवे.”
त्यांनी पुढे, ” स्वातंत्र्यवीर सावरकर हा प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा चित्रपट आहे. तो चित्रपट सगळ्यांनी किमान एकदा तरी पाहावा, असं मी आवाहन करतो. तुमचे मतभेद असतील, तर ते तुम्ही नक्की व्यक्त करा. पण त्याआधी समोरची व्यक्ती काय सांगतेय, ते तरी ऐका. फक्त एका बाजूचीच गोष्ट ऐकू नका”, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा, असे सांगितले.
“त्यावेळी तिला तितके काम मिळत नव्हते”
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दलही पवन मल्होत्रा यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओएमजी २ या सिनेमात मी तिच्याबरोबर काम केले. त्याआधी मला तिच्याबद्दल माहीत नव्हते. तिला भेटल्यानंतर मला वाटले की, ती किती चांगली अभिनेत्री आहे आणि ती सुंदरसुद्धा आहे. पण, त्यावेळी तिला तितके काम मिळत नव्हते. तिचे जे आधीचे चित्रपट अपयशी ठरले, ते काही तिच्या एकटीमुळे अपयशी ठरले नव्हते. त्यात इतरही कलाकार होते. पण, त्यांना काम मिळत होते, तसे यामीला मिळत नव्हते. पण, एकेक पाऊल पुढे टाकत मेहनत सुरू ठेवली आणि अखेर तिनं आपलं स्थान निर्माण केलं”, असे म्हणत त्यांनी यामीचे कौतुक केले.
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांबद्दल बोलताना त्यांनी स्वत:ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांबद्दलही वक्तव्य केले. १९९८ मध्ये फकीर या हिंदी चित्रपटासाठी पवन यांना पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फौजा’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
या पुरस्कारांबद्दल ते म्हणाले, “दोन्ही वेळा पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकून मला आश्चर्य वाटले होते. पण, मला खूप आनंद झाला. काही पुरस्कारांवर माझा विश्वास नाही किंवा त्यांच्याबद्दल मला आदरही वाटत नाही. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. त्यामुळे हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी खूपच अभिमान आणि आनंदाची भावना होती”, असे म्हणत पवन मल्होत्रा यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
