पंकज त्रिपाठी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आजपर्यंत त्यांनी विविधघ धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. भूमिकेनुसार त्यांचा अभिनय, संवाद बोलण्याची स्टाईल, नेमक्या वेळी आवाजात असणारे चढ-उतार यामुळे पंकज त्रिपाठींच्या अभिनयावर फक्त प्रेक्षकच नाही तर कलाकारही कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. पंकज त्रिपाठींचा चाहतावर्ग मोठा आहे.
आता मात्र पंकज त्रिपाठी त्यांच्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंकज त्रिपाठींनी अभिनय क्षेत्रात काम करायचे होते, त्यामुळे त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना काय अनुभव आले, पहिल्यांदाच कोणत्या गोष्टी पाहायला मिळाल्या, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले.
पंकज त्रिपाठी यांनी युवा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “२००१ ला मी पहिल्यांदा दिल्लीत आलो होतो. त्यावेळी मी पहिल्यांदा मुलींना सिगारेट ओढताना पाहिले होते. ते पाहिल्यानंतर मला धक्का बसला. त्यावेळी मला असे वाटायचे की या कशा मुली आहेत? पण, १५ दिवस दिल्लीत राहिल्यानंतर मला जाणवले की या सगळ्याकडे पाहण्याचा हा योग्य दृष्टीकोण नाही.”
“लोक मला खूप लवकर…”
पुढे पंकत्र त्रिपाठी असेही म्हणाले, “माझ्या भाषेमुळे, मला इंग्रजी येत नसल्यामुळे लोक मला खूप लवकर जज करत असत. त्यांना असे वाटायचे की ज्यांना इंग्रजी येत नाही, ते गरीब घरातील असणार. तुम्ही कोणती भाषा बोलता यावरून लोक तुमची क्षमता ठरवतात. पण, खरेतर या दोन्हीचा काहीही संबंध नाही.”
पंकज त्रिपाठी म्हणाले की अशा अनुभवांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पण, मी माझ्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ दिला नाही. ते म्हणाले, “याकडे पाहण्याचे दोन मार्ग असतात. पहिले म्हणजे, यामुळे स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. दुसरे म्हणजे त्यातून बाहेर पडून स्वतःला आणखी मजबूत बनवता येते. सुदैवाने मी त्या नकारात्मक विचारांमध्ये अडकलो नाही. मला कधीच स्वतःची ओळख हरवल्यासारखं वाटलं नाही आणि त्यामुळेच मी त्या कठीण काळातून बाहेर पडू शकलो.”
पंकज त्रिपाठींना गॅग्स ऑफ वासेपुरमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्या सिनेमानंतर पंकज त्रिपाठींचा संपू्र्ण देशभरात चाहतावर्ग निर्माण झाला. कागज, मिमी, मेट्रो इन दिनों, काला, स्त्री, स्त्री २ अशा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या बरोबरच ते अनेक ओटीटीवरी वेब सीरिजमध्येही महत्त्वाच्या भूमिकांत दिसतात.
