scorecardresearch

सलमानचा ‘फिर मिलेंगे’ ते जुही चावलाचा ‘माय ब्रदर निखिल’; ‘हे’ आहेत एड्सबद्दल भाष्य करणारे बॉलिवूड चित्रपट

आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी १ डिसेंबर रोजी जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो.

सलमानचा ‘फिर मिलेंगे’ ते जुही चावलाचा ‘माय ब्रदर निखिल’; ‘हे’ आहेत एड्सबद्दल भाष्य करणारे बॉलिवूड चित्रपट
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एचआयव्ही म्हणजेच एड्स या आजाराची लक्षणं, कारणं आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी १ डिसेंबर रोजी जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो. या आजाराने आतापर्यंत असंख्य जीव घेतले आहेत. ज्या आजाराविषयी फारचं मोकळेपणानं बोललं जात नाही, त्या आजारावर अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून भाष्य करण्यात आलंय. अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

फिर मिलेंगे

२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. यात अभिषेक बच्चनचीही प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट एका कर्मचाऱ्याला एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकण्याबद्दल होता. रेवतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘एएनआय’ने याबद्दल वृत्त दिलंय.

माय ब्रदर निखिल

२००५ मध्ये आलेला ‘माय ब्रदर…निखिल’ हा एचआयव्ही विषयावरील आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट बॉलिवूड चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट स्विमिंग चॅम्पियन निखिल कपूरभोवती फिरतो. त्याला एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. या काळात त्याच्या पाठीशी त्याची बहीण अनामिका (जुही चावला) ठामपणे उभी राहते. या चित्रपटातून समलैंगिक संबंधांवरही भाष्य करण्यात आलं होतं.

निदान

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘निदान’ चित्रपटात एका किशोरवयीन मुलीची कहाणी दाखवण्यात आली होती. तिला रक्त संक्रमणाद्वारे हा आजार होतो. हा २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. रीमा लागू, सुनील बर्वे आणि शिवाजी साटम यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

दस कहानियाँ

‘दस कहानियाँ’ हा सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या दहा शॉर्ट फिल्म्सचा संग्रह आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित जहीर नावाचा एक चित्रपट ‘एड्स’ भोवती फिरतो. या चित्रपटात दिया मिर्झा आणि मनोज बाजपेयी होते. यामध्ये सिया नावाच्या तरुणीची तिच्या नवीन शेजारी साहिलशी मैत्री होते. मैत्री झाल्यानंतर, साहिल जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करतो, पण सिया नकार देते. एका रात्री तो त्याच्या मित्रांसह बारमध्ये गेल्यावर सिया त्याला बार डान्सर म्हणून काम करत असल्याचं दिसतं. तो निराश होतो आणि दारूच्या नशेत तिच्या घरी जातो. तिथे सिया त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना तो तिच्यावर बलात्कार करतो. त्यानंतर सियाला एड्स असल्याचं कळतं.

पॉझिटीव्ह

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘पॉझिटिव्ह’ ही एका अशा तरुणाची कहाणी आहे, ज्याला कळतं की त्याच्या वडिलांना काही वर्षांपूर्वी एड्सची लागण झाली होती. त्याच्या वडिलांनी त्याच्या आईची फसवणूक केली असते. नातेसंबंध आणि एड्सबद्दल भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शबाना आझमी, बोमन इराणी आणि अर्जुन माथूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 18:16 IST

संबंधित बातम्या