Piyush Mishra opens up about his battle with alcohol addiction : इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत ज्यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे त्यांना कठीण काळातून जावं लागलं. अनेक जण मोकळेपणानं याबद्दल आतापर्यंत बोलले आहेत. अशातच आता लोकप्रिय लेखक व अभिनेता पीयूष मिश्रा यांनीही त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल सांगितलं आहे.

पीयूष मिश्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय लेखक व अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत लोकप्रिय चित्रपट व सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘पिंक’, ‘तमाशा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’, ‘हॅपी भाग जायेगी’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. तर काही लोकप्रिय चित्रपटांसाठी गीतसुद्धा लिहिले आहेत.

पीयूष मिश्रा काय म्हणाले?

पीयूष मिश्रा यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्यांना दारूचं व्यसन आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम याबद्दल सांगितलं आहे. शुभंकर मिश्राशी संवाद साधताना पीयूष म्हणाले, “एक वेळ अशी येते की दारू पिणं गरजेचं वाटायला लागतं. दारूचा परिणाम असा असतो की माणसाला अजून पिण्याची इच्छा होते. दारूचं व्यसन हा जीवघेणा आजार आहे, आणि व्यसनाधीन माणसालाही आपण व्यसनी आहोत हे कळत नाही. वैद्यकीय शास्त्रातही यावर ठोस उपाय नाही. एक वेळ अशी येते की तुम्हाला आवडो किंवा न आवडो, शरीराला दारूची गरज भासते. मी स्वतः हे अनुभवलं आहे.”

Award Banner

दारू पियून कधीच काम केलं नाही

पीयूष मिश्रांनी त्यांना दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असं सांगितलं असलं तरी दारू पियून आपण कधीच काम केलं नाही असंही ते म्हणाले आहेत. मी दारू पियून कधीच काम केलेलं नाहीये. मी कधीच दारू पियून सेटवर गेलो नाहीये. त्याचा माझ्यावर परिणाम झाला, ‘हुस्ना’ गाणं गाताना मला दारू पिण्याचा विचार आलेला पण मी तसं केलं नाही. मला दारू प्यावीशी वाटते म्हणून मी दारू प्यायचो”.

पीयूष यांनी पुढे दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या स्वभावावर कसा परिणाम झाला आणि दारू प्यायल्यानंतर केलेल्या कृतीची जाणीव झाल्यानंतर किती त्रास झाला याबद्दल सांगितलं आहे. अभिनेते म्हणाले, “दारू प्यायल्यानंतर मी खूप गोष्टी केल्या ज्याचा नंतर मला त्रास झाला आणि जाणवलं की हा मी नाहीये. माझे आईबरोबर वाद होते. मी तिला खूप त्रासदायक गोष्टी बोललो आहे. माझी आई मुंबईत माझ्याबरोबर राहत होती आणि तेव्हा मला जाणवलं की भूतकाळात जे काही घडलं त्यासाठी मी तिला माफ करायला हवं. मी माफ केलेलं खरंतर पण, तरीसुद्धी मी तिला खूप वाईट गोष्टी बोललो.”

दारू प्यायल्यानंतर स्त्रियांना करायचा अश्लील फोन कॉल्स

पीयूष मिश्रा पुढे म्हणाले, “मी नशेत असताना अनेक स्त्रियांना अश्लील फोन करायचो. सकाळी उठल्यावर मला त्यातील काहीही आठवत नसे. जेव्हा समोरून लोक मला सांगायचे की मी रात्री फोनवर चुकीचे वागलो आहे, तेव्हा माझा स्वतःवर विश्वास बसत नसे. मी शुद्धीत असताना असं कृत्य कधीच केलं नसतं, पण त्यावेळी माझं स्वतःवर नियंत्रण नसायचं.”

दारूच्या व्यसनाचा कामावर झाला परिणाम

पीयूष मिश्रा यांच्या दारूच्या व्यसनाचा त्यांच्या कामावर परिणाम झाल्यचंही त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते म्हणाले, “लोक मला घाबरायचे कारण मी विचित्र वागायचो. दारूच्या व्यसनाचा माझ्या कामावर परिणाम होत होता. लोक माझ्याबरोबर काम करणं खूप कठीण आहे असं म्हणायचे आणि आजही बोलतात.मी खूप तापट आहे असं त्यांना वाटतं आणि मी हे सांगून थकलोय की आता मी तसा नाहीये. माझ्यामध्ये बदल झाला आहे.”