Piyush Mishra on Relationship with sons: लोकप्रिय अभिनेते, लेखक व कवी म्हणून पीयूष मिश्रा यांची ओळख आहे. ते विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नुकतीच त्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. लग्न, दारूचे व्यसन अशा सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी वक्तव्य केले.

आता त्यांचे आणखी एक वक्तव्य चर्चेत आहे. त्यांनी त्यांच्या बालपणाबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, माझे बालपण तितकेसे चांगले नव्हते. आई-वडिलांबरोबरचे माझे नाते तणावपूर्ण होते. मला आलेल्या अनुभवांचा प्रभाव मी जेव्हा वडील झालो, त्यावर पडला.

शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत पीयूष मिश्रा म्हणाले, “माझा सुरुवातीचा काळ कठीण होता. मी भाविनकदृष्ट्या रिता झालो होतो. माझ्या बालपणाचा माझ्यावर परिणाम झाला होता. तो मला सोडून देणं गरजेचं होतं. त्या गोष्टी घेऊन मी पुढे जाऊ शकत नव्हतो. ते जेव्हा मागे सोडलं, त्यावेळी मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकलो. माझं बालपण कधीच चांगलं नव्हतं. माझ्यात न्यूनगंड होता. माझ्या आई-वडिलांकडून मला जे हवं होतं, ते मला मिळालंच नाही.”

ते असेही म्हणाले, “माझ्या आई-वडिलांची समज मर्यादित होती. त्यामुळे मला जे त्यांच्याकडून मार्गदर्शन पाहिजे होतं, ते मला कधीच मिळालं नाही. लोक अनेकदा त्यांच्या वडिलांना देवाच्या जागी मानतात. माझ्यासाठी ते कधीच तसं नव्हतं. उलट मला त्याच्या विरुद्ध अनुभव आला. मी जाणीवपूर्वक माझ्या पालकांच्या विरुद्ध वागत असे. मी माझ्या वडिलांना थेट सांगितलं होतं की, तुम्ही चुकीचे आहात. मुलाला कसं वाढवायचं हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मला वाढवलं आहे.”

ते पुढे असेही म्हणाले, “मी एक उत्तम वडील आहे, असा मला विश्वास आहे. मी माझ्या मुलांना स्वातंत्र्य दिलं. त्यांना जे करायचं आहे, ते करू दिलं. कारण- मला जे आयुष्यात करायचं होतं, ते मी करू शकलो नाही. माझी दोन्ही मुलं त्यांना जे हवं, ते करत आहेत. आम्ही त्यांच्यावर काहीही लादलं नाही.”

ते असेही म्हणाले, “माझ्या मुलांना खरं तर माझ्या पत्नीनं वाढवलं आहे. मी अनेकदा माझ्या संघर्षात अडकलेला असायचो. मी माझ्या कुटुंबावर जास्त लक्ष देऊ शकत नसे; पण माझ्या पत्नीनं मुलांची काळजी घेतली, त्यांना वाढवलं. असं असलं तरी माझं माझ्या मुलांबरोबरचं नातं खूप चांगलं आहे. मी एक चांगला पिता आहे, असं त्यांचं म्हणणे आहे. आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत.”

दरम्यान, पीयूष मिश्रा यांनी आर्किटेक्ट प्रिया नारायणन यांच्याशी १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना जोश व जय अशी दोन मुले आहेत.