Pooja Batra reveals anecdote: संगीता बिजलानी, पूजा बत्रा, सुश्मिता सेन, दीपिका पादुकोण या बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये काय साम्य आहे, हे माहीत आहे का? या अभिनेत्री अभिनयात येण्याआधी मॉडलिंग क्षेत्रात काम करीत असायच्या. त्याव्यतिरिक्त त्यांच्यात आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांची उंची. या अभिनेत्री खूप उंच आहेत.

इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांची उंची ही त्यांच्या सहकलाकारांच्या उंचीपेक्षा कमी आहे. पण, अनेक पुरुष कलाकारांचा अहंकार मोठा होता, महिला सहकलाकारांनी त्यांच्यापेक्षा बुटके असायला हवे, किंवा सहअभिनेत्रींची उंची कमी असावी, असे पुरुष कलाकारांना वाटत असे. महिला कलाकारांना कशी वागणूक मिळते याबद्दलच्या खुलाशात अनेक अभिनेत्री त्याबद्दलचे किस्से सांगतात.

“माझ्या उंचीमुळे मला जास्त…”

अभिनेत्री पूजा बत्राने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत संगीता बिजलानीने तिला काय सांगितले होते, याचा खुलासा केला. संगीता बिजलानीनने १९८८ ला कातिल या सिनेमातून पदार्पण केले होते. आठ वर्षे अभिनेत्रीने मुख्य नायिका म्हणून काम केले. १९९६ ला प्रदर्शित झालेला निर्भय हा तिचा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमात अभिनेत्रीबरोबर मिथुन चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते.

पूजा बत्राने ‘हार्पर्स बझार इंडिया’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला आठवतं की, संगीता बिजलानीनं सांगितलं होतं की, तुला चित्रपटात काम मिळणार नाही. कारण- तू खूप उंच आहेस.

संगीता बिजलानीच्या त्या वक्तव्यामुळे वाईट वाटले होते, असा खुलासा करीत पूजा म्हणाली, “ती माझा आदर्श होती, सुंदर होती आणि ती मॉडेलसुद्धा होती. त्यामुळे तिच्या बोलण्यामुळे मला वाईट वाटले होते. मला ज्या भूमिका मिळाल्या, त्या भूमिका मी उत्तमरीत्या साकारल्या. माझ्या उंचीमुळे नायक प्रभावीपणे दिसत नसत. त्यामुळेच, माझ्या उंचीमुळे मला जास्त चित्रपट मिळाले नाहीत. त्यामुळे मी अनेक चांगल्या भूमिका गमावल्या.”

पूजा असेही म्हणाली की, संगीता व माझ्यासारख्या उंच अभिनेत्रींमुळे नंतरच्या काळात आलेल्या सुष्मिता, दीपिकासारख्या अभिनेत्रींचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी आमचे आभार मानले पाहिजे, असे ती हसत म्हणाली.

१९९३ मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकल्यावर पूजा प्रसिद्धीच्या झोतात आली. ती भारतातील लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक होती. त्यानंतर पूजाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने ‘कुछ खट्टी कुछ मीठी’, जोडी नं. १’, ‘नायक : द रिअल हीरो’, ‘तलाश: द हंट बिगिन्स’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसोबतच काही तमीळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले.

प्रियदर्शन यांच्या १९९७ सालच्या हिट ॲक्शन चित्रपट ‘विरासत’मधून पूजाने बॉलीवू़डमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात नायक तिच्यापेक्षा उंच दिसावा यासाठी तिला काय करावे लागायचे, याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “कॅमेरासमोर हीरो उंच दिसण्यासाठी मला माझे अर्धे पाय पसरून बसावे लागत असे.”

ती असेही म्हणाली, फक्त एकाच अभिनेत्याला अभिनेत्रींच्या उंचीमुळे काही समस्या नव्हती. सलमान खानला अभिनेत्री उंच आहे म्हणून कधी असुरक्षित वाटले नाही. पूजाने सलमान खानबरोबर कहीं प्यार ना हो जाये या सिनेमात काम केले आहे. त्या सिनेमातील आठवण सांगत म्हणाली, “सलमान हा एकमेव अभिनेता होता, जो म्हणत असे की, तू तुझ्या उंच टाचेच्या सँडल घाल. मला काहीच समस्या नाही. तो आत्मविश्वासू होता.”

पूजाने २००३ मध्ये एका ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू अहलुवालियाशी लग्न केले आणि कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे स्थायिक झाली; पण २०११ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर ती भारतात परतली. त्यानंतर तिने २०११ ला प्रदर्शित झालेल्या ‘हम तुम शबाना’, ‘एबीसीडी २’ आणि इतर हॉलीवूड चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. २०१९ मध्ये तिने अभिनेता नवाब शाहबरोबर पुनर्विवाह केला.