मनोरंजन विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. ९०च्या काळातही अशाच दोन लोकप्रिय सेलिब्रिटींच्या अफेअरची चर्चा होती. ते म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी व आदित्य पांचोली. आदित्य पांचोली विवाहित असल्याने हे प्रकरण अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलेलं. पूजानेही आदित्य यांच्याबद्दल आतापर्यंत अनेकदा भाष्य करत आरोप केले आहेत. तिने तिच्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीबाबतही आदित्य पांचोलींवर आरोप केले होते. अशातच नुकतंच पूजा बेदीने आदित्य यांच्याबद्दल स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा बेदीने एका मासिकाशी संवाद साधताना याबद्दल स्वत: खुलासा केला होता अशीही चर्चा आहे. नुकतंच विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत तिने आदित्य पांचोलींबरोबरच्या अफेअरबद्दल विचारल्यानंतर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. आदित्य यांची दोन्ही मुलं आता मोठी झाली असून त्यांच्याबद्दल बोलल्याने त्यांना त्रास होऊ शकतो असंही पूजा बेदीने या मुलाखतीत सांगितलं.
आदित्य पांचोलींबरोबरच्या अफेअरबद्दल पूजाची प्रतिक्रिया
पूजा बेदीला आदित्य पांचोली यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने अभिनेत्याबरोबरचं नातं भयानक असल्याचं म्हटलं आहे. तसंच, आता ती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की आदित्य किंवा त्यांच्याबरोबरच्या जुन्या गोष्टींबद्दल वारंवार बोलण्याची इच्छा नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. याबद्दल बोलताना पूजा बेदी म्हणाली, “तो माझ्यासाठी एक अनुभव होता, एवढंच म्हणूया”. याबद्दल पूजा पुढे म्हणाली, “त्यांची दोन गोंडस मुलं आहेत आणि आता ती मोठी झाली आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टींबद्दल वारंवार बोलत राहणं योग्य वाटत नाही. कोणाला याबद्दल वाचायचं असेल तर ते गुगलवर शोधू शकतात. पण पुन्हा पुन्हा हा विषय समोर आणणं त्यांच्या मुलांसाठी योग्य नाही”.
आदित्य पांचोलींवर झालेले आरोप
मंनी कंट्रोलच्या वृत्तानुसार पूजा बेदी आणि आदित्य पांचोली यांच्या ब्रेकअपनंतर आणखी एका वादाला तोंड फुटलं होतं. पूजाच्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने आदित्य पांचोली यांच्यावर काही आरोप केले होते. त्यावेळी पूजाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जातं. तर Bollywood Shaadis.com च्या वृत्तानुसार १९९०च्या दशकात एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पूजाने खुलासा केला होता की, तिच्या घरी घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपले आदित्य पांचोली यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं. काही लव्ह बाइट्स पाहिल्यानंतर पूजाने घरकाम करणाऱ्या मुलीची चेष्टा केली आणि त्यानंतर तिने आदित्यबरोबरच्या नात्याबद्दल सांगितल्याचं पूजाने या मुलाखतीत म्हटलं होतं.
पूजाने सांगितलं होतं की “काही दिवसांपूर्वी माझ्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीने मला तिच्या मानेवरचे लव्ह बाइट्स दाखवले. मी तिची चेष्टा करत तिला तिचा आशिक कोण आहे, असं विचारलं. मात्र, तिने तिचा कोणीही आशिक नसल्याचं सांगितलं.” याच मुलाखतीत पूजाने पुढे सांगितलं की, तिने तिच्या घरी घरकाम करणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला पुन्हा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारल्यानंतर, तिने तो तिचा तत्कालीन बॉयफ्रेंड आदित्य पांचोली असल्याचं म्हटलं.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या सगळ्या प्रकारामुळे पूजाला मोठा धक्का बसला होता. याबाबत पुढे बोलताना तिने सांगितलेलं की, तिच्या घरी काम करणाऱ्या मुलीने हे नातं एका महिन्याहून अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगितलं होतं. याबद्दल अधिक माहिती देताना त्या मुलीने सांगितलं की, पूजा आणि आदित्य यांच्यात भांडण झालं होतं, त्याच काळात आदित्य यांनी तिच्याबरोबर पहिल्यांदा संबंध ठेवले. पूजाने असाही आरोप केला होता की, आदित्य तिला अभिनेत्री बनवण्याचं खोटं आश्वासन देऊन तिच्या भावनांशी खेळले होते.
