आमिर खानने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यातीलंच एक म्हणजे ‘जो जीता वही सिकंदर’. आमिर खानच्या कारकिर्दीतील हा लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यातील गाणी, पात्र सगळंच प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. अशातच आता यातील अभिनेत्रीने आमिर खानबरोबर एका चित्रपटात इंटिमेट सीन करण्याचा अनुभव सांगितला आहे.
दिग्दर्शक मन्सूर खान यांचा ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात आमिर खान, दीपक तिजोरी, पूजा बेदी, मामिक सिंह आणि आयशा झुल्का यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. परंतु, त्यादरम्यान आमिर खान आणि पूजा बेदी एकमेकांकडे आकर्षित झाले होते अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.
चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दशकं उलटल्यानंतर पूजा बेदीने विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला ती आणि आमिर खान एकमेकांकडे आकर्षित झाले होते, या चर्चेत काही तथ्य होतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर तिने याबद्दल उत्तर दिलं आहे. यावेळी ती “तुम्ही गंमत करत आहात ना?” असं उत्तर देत याच संवादादरम्यान ‘आतंक ही आतंक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्साही सांगितला. या चित्रपटात तिने केमिओ केला होता. तिने सांगितलं की, त्यावेळी तिने व आमिर खानने एक इंटीमेट सीन शूट केला होता मात्र तो सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला.
या अनुभवाबद्दल सांगताना पूजा बेदी म्हणाली, “आम्ही फिल्म सिटीच्या जवळ एका बंगल्यात शूटिंग करत होतो. त्याकाळी आतासारख्या मेकअप व्हॅन नव्हत्या आणि एक शॉट झाल्यानंतर कलाकार आपल्या व्हॅनमध्ये परत जात नव्हते. स्टुडिओ हा एका मोठ्या व्हिलासारखा होता. शॉट संपल्यानंतर लगेच आम्हा दोघांना एका खोलीत पाठवण्यात आलं.”
आमिर त्या घाणेरड्या सहकलाकारांसारखा नव्हता – पूज बेदी
पूजा बेदी पुढे म्हणाली, “मी त्या खोलीत बसले होते आणि आमिरही तिथेच होता. तिथे एक बेड होता. त्यावेळी माझ्या मनात अक्षरशः लाखो विचार सुरू झाले. एक तरुण अभिनेत्री म्हणून मला वाटलं, बॉलिवूडमध्ये ज्याबद्दल बोललं जातं, त्याचाच हा काही भाग आहे का? पुढे नेमकं काय होणार? त्यामुळे मी थोडी गोंधळले आणि घाबरलेही.”
पूजा बेदीने पुढे सांगितलं की, खोलीतील तणावाचं वातावरण आमिर खानने अगदी सहजपणे हलकं केलं. ती म्हणाली, “आमिर तिथे शांत बसला होता आणि मीही शांत बसले होते. त्याने खोलीचा दरवाजा कधी बंद केला, हेही कळलं नाही. आमिर माझ्याकडे पाहत होता आणि मी त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा त्याने मला विचारलं,चेस खेळणार का?” ती पुढे म्हणाली, “मी म्हटलं, हो, मला नक्की खेळायला आवडेल. कारण आम्ही दोघंही त्यावेळी बऱ्याचदा बुद्धिबळाचा खेळ खेळायचो. मी त्याला म्हटलं, चेसचा सेट घेऊन या. त्याने चेसचा सेट आणला आणि तो बाहेर ठेवला.” या प्रसंगाची आठवण सांगताना पूजा बेदी म्हणाली, “तेव्हा मला सुटकेचा निःश्वास टाकल्यासारखं वाटलं. तो एक सभ्य आणि चांगला माणूस आहे, याची मला जाणीव झाली. तो त्या घाणेरड्या सहकलाकारांपैकी नव्हता”.
