पूजा बेदी बॉलीवूडमधील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. ९०च्या काळात अभिनेत्रीचं नाव बॉलीवूडचा पर्फेक्शनिस्ट आमिर खानसह जोडलं गेलं होतं आणि त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. यासह पूजा बेदी व अभिनेता आदित्य पांचोली यांच्या अफेअरच्याही चांगल्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता पूजाने तिच्या या रिलेशनशिपबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

१९९०च्या दरम्यान पूजा बेदी व आदित्य पांचोली यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी बॉलीवूडमधील चर्चेत राहिलेल्या वादग्रस्त प्रकरणांपैकी हे एक होतं. आदित्य पांचोली विवाहित असताना पूजा बेदीबरोबर त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाने त्यावेळी माध्यमांचंही मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतलं होतं. अनेक वर्षांनंतर आता पूजा बेदीने या जुन्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मात्र, हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्याची आपली इच्छा नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. विशेषतः या प्रकरणामुळे आदित्य पांचोली यांच्या मुलांना त्रास होऊ नये, असंही पूजाचं म्हणणं आहे.

आदित्य पांचोलींबरोबरच्या नात्याबद्दल पूजा बेदीचं वक्तव्य

नुकतंच विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बेदीला आदित्य पांचोली यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने अभिनेत्याबरोबरचं नातं वादळी असल्याचं म्हटलं आहे. तसंच, आता ती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की आदित्य किंवा त्यांच्याबरोबरच्या जुन्या नात्याबद्दल वारंवार बोलण्याची इच्छा नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. या नात्याबद्दल बोलताना पूजा बेदी म्हणाली, “तो माझ्यासाठी एक अनुभव होता, एवढंच म्हणूया”.

पूजा बेदीच्या म्हणण्यानुसार, हे कथित अफेअर तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात होत असतानाच्या काळातील आहे. तिचे आई-वडील कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत ती अभिनय क्षेत्रात येत होती. वयाच्या १८व्या वर्षी ती भारतात परतली आणि आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत असतानाच तिची भेट आदित्य पांचोली यांच्याशी झाली. त्यावेळी आदित्य पांचोली यांचं लग्न झरीना वहाब यांच्याशी झालं होतं. पुढे आदित्य पांचोली यांच्याबरोबरचं नातं संपुष्टात आलं. मात्र, ब्रेकअपनंतरही आदित्य पांचोली यांच्याशी संबंधित प्रश्नांनी पिच्छा सोडला नाही. असं तिने सांगितलं आहे.

पूजा बेदीने सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून तिला आदित्य पांचोली यांच्याबद्दल वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, या विषयावर बोलणं तिने बहुतांश वेळा टाळलंच. त्याबाबत चर्चा करणं तिला पसंत नसल्याचं तिने म्हटलं आहे. पूजा बेदीने सांगितलं की, आदित्य पांचोली यांच्या मुलांचाही विचार करून ती या विषयावर बोलणं टाळते. वडिलांच्या भूतकाळातील नात्यांबद्दल वारंवार ऐकल्यामुळे त्यांच्या मुलांवर परिणाम होऊ शकतो, असं तिला वाटतं.

याबद्दल पूजा म्हणाली, “त्यांची दोन गोंडस मुलं आहेत आणि आता ती मोठी झाली आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टींबद्दल वारंवार बोलत राहणं योग्य वाटत नाही. कोणाला याबद्दल वाचायचं असेल तर ते गुगलवर शोधू शकतात. पण पुन्हा पुन्हा हा विषय समोर आणणं त्यांच्या मुलांसाठी योग्य नाही.” रिपोर्ट्सनुसार, पूजा बेदी आणि आदित्य पांचोली यांच्या ब्रेकअपनंतर आणखी एका वादाला तोंड फुटलं होतं. पूजाच्या घरी काम करणाऱ्या तिच्या अल्पवयीन मदतनीसने आदित्य पांचोली यांच्यावर काही आरोप केले होते. त्यावेळी पूजाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जातं. मात्र, आदित्य पांचोली आणि संबंधित घरकाम करणाऱ्या महिलेने त्यांच्यातील संबंध परस्पर संमतीने असल्याचा दावा केला होता.

लग्नाच्या १३ वर्षांनंतर मोडला संसार

पूजा बेदीने पुढे सांगितलं की, आजही तिची आदित्य पांचोली यांच्याशी अधूनमधून वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेट होते. मात्र, दोघेही एकमेकांशी बोलणं टाळतात. ती म्हणाली, “तुम्ही सभ्यपणे वागू शकता, नजर चुकवू शकता आणि तिथून निघून जाऊ शकता. दरम्यान, पूजा बेदीने १९९४ मध्ये फरहान फर्निचरवाला यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, २००३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दाम्पत्याला अलाया एफ आणि ओमर ही दोन मुलं आहेत.