Pooja Bedi on marriage with Maneck Contractor: अभिनेत्री पूजा बेदी सध्या तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचे खासगी आयुष्य, रिलेशनशिप यांबद्दलही वक्तव्य केले आहे. तसेच, भविष्यात तिला लग्न करायचे आहे की नाही, याबद्दलही ती बोलली आहे. ती नेमके काय म्हणालीय, याबद्दल जाणून घेऊ…

पूजा बेदीचे पहिले लग्न १९९४ मध्ये फरहान फर्निचरवालाबरोबर झाले होते. २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पूजाचा लग्नव्यवस्थेवरून विश्वास उडाला. घटस्फोटानंतर ती पुन्हा प्रेमात पडली आहे; मात्र आता लग्नाबद्दल तिचे वेगळे मत आहे. ती आठ वर्षांपासून उद्योगपती मानेक कॉन्ट्रॅक्टरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. २०१९ मध्ये तिने त्याच्याबरोबर साखरपुडाही केला आहे. मात्र, तरीही तिने लग्नाचा निर्णय घेतला नाही.

“मला जे अनुभव आले…”

पूजा बेदीने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती म्हणाली की, एक काळ होता, जेव्हा मी लग्नाचा विचार करीत होते. या परंपरांवर माझा विश्वास होता. मात्र, मला जे अनुभव आले, त्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला आहे. आज मी मानेकबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या साखरपुड्याला आठ वर्षं झाली आहेत. लोक मला विचारतात की, तू लग्न कधी करणार? मी त्यांना उत्तर देते की, मी लग्न करणार नाही.

पुढे ती म्हणाली, “साखरपुडा म्हणजे तो क्षण जेव्हा कोणीतरी तुमच्या बोटात अंगठी घालतं आणि म्हणतं की, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ज्याचा अर्थ असतो की, मला माझं उरलेलं सगळं आयुष्य तुझ्याबरोबर, तुझा जोडीदार म्हणून, तुझं प्रेम म्हणून, तुझा पती म्हणून आणि तुझ्या मुलांचा बाप म्हणून घालवायचं आहे. केवळ तेवढी वचनबद्धता पुरेशी आहे. त्यानंतर कागदावर तुम्ही सही करता आणि या सगळ्या गोष्टीत सरकारला सामील करून घेता.”

मानेक यांचेही पहिले लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत; तर पूजालाही दोन मुले आहेत. त्याबद्दल ती म्हणाली की, हे खूप सोपं आहे. माझं लग्न झालं, घटस्फोट झाला आणि मला दोन मुलं आहेत. त्याचंही लग्न झाले, घटस्फोट झाला आणि त्यालाही मुलं आहेत. माझी मालमत्ता माझ्या मुलांना मिळेल, त्याची मालमत्ता त्याच्या मुलांना मिळेल. मी कमावते, तो कमावतो. मला सुरक्षेसाठी त्याची गरज नाही. त्यालाही सुरक्षित वाटण्यासाठी माझी गरज नाही. मला आता लग्न करायचं नाही. माझ्या मते, प्रत्येकानं लग्न केलं पाहिजे. मला वाटतं की, लग्न ही खूप चांगली गोष्ट आहे. मी आधी एकदा लग्न केलं होतं. आता पुन्हा लग्न करावं असं मला वाटत नाही. मानेक व माझ्या कुटुंबाला एकमेकांबद्दल आपुलकी आहे. माझ्या मुलांना तो आवडतो. मला त्याचं कुटुंब आवडतं. त्यामुळे माझ्यासाठी आम्ही जवळजवळ कायमचे एकत्र आहोत”, असे म्हणत अभिनेत्रीने पुन्हा लग्न करणार नाही, असे स्पष्ट केले.