This Bollywood Actress Talks About Inter Faith Marriage : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिने आमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं होतं. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच तिने लग्नासाठी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचं लग्न, घटस्फोट आणि कुटुंबाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

पूजाने सांगितले की, तिने १९९४ मध्ये फरहान फर्निचरवाला यांच्याशी लग्न केलं होतं. अत्रिनेत्री याबद्दल म्हणाली, “मी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं, पण त्या काळात आजसारखा हिंदू-मुस्लिम वाद नव्हता. त्या वेळी समाज अधिक धर्मनिरपेक्ष या विचारांवर चालणारा होता आणि लोकशाहीवादी होता”. सासरचे लोक पारंपरिक विचारांचे असल्याने स्वतःची ओळख जपत तिथे राहणं कठीण झालं असतं, असंही तिने सांगितलं. त्यामुळेच ‘जो जीता वही सिकंदर’नंतर मिळालेल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर तिने नाकारल्या. असंही ती म्हणाली.

…म्हणून लग्नानंतर सोडलं बॉलीवूड

पूजा पुढे म्हणाली, “मी पत्नी आणि सून म्हणून आयुष्य जगायचं ठरवलं होतं आणि त्यात सर्वोत्तम बनायचं होतं”. त्या काळात लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपल्यासारखं मानलं जायचं, असंही तिने सांगितलं आहे. लग्नाबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, “आयुष्यात अनेक चुका केल्या, पण माझं लग्न ही चूक नव्हती. लग्न हा एक अनुभव आणि प्रवास असतो.” तिने तिचे विभक्त पतीचे आभार मानत सांगितलं की, “माझ्या दोन सुंदर मुलांसाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. आजही माझे विभक्त पती माझे सर्वात चांगले मित्र आहेत.”

१२ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिची मुलगी ५ वर्षांची तर मुलगा २ वर्षांचा होता. याबद्दल पूजा म्हणाली, “मी २४ व्या वर्षी लग्न केलं आणि ३२ व्या वर्षी घटस्फोट घेतला. मी लग्नात आनंदी होते आणि घटस्फोटानंतरही आनंदी होते. १२ चांगली वर्षे चांगली म्हणून पुढची ५० वर्षे वाईट घालवायची गरज नाही”.

तिने पुढे सांगितलं की, घटस्फोट हा आयुष्यातील कठीण टप्पा होता. पण नातं सुधारण्याच्या पलीकडे गेलं आहे, हे लक्षात आल्यानंतर निर्णय घ्यावाच लागतो. पूजा म्हणाली की, तिला घटस्फोट वाईट वाटत नाही कारण तिचे आई-वडील कबीर बेदी आणि प्रतिमा बेदी यांचाही ती पाच वर्षांची असताना घटस्फोट झाला होता. मात्र, वेगळं झाल्यानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि आदराचं नातं कायम होतं. पूजाने तिच्या एक्स पतीच्या सध्याच्या पत्नी लैलाबद्दलही म्हणाली, “लैला खूप चांगली आहे. तिचा मुलगादेखील आमच्या कुटुंबाचाच भाग आहे”.