Pooja Bhatt Bobby Deol: पूजा भट्टने ‘दिल हैं कि मानता नहीं’, ‘सडक’, ‘बॉर्डर’, ‘जख्म’ अशा अनेक सिनेमांत काम करत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते.

आता अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कारकि‍र्दीबद्दल, वडिलांबद्दल, महेश भट्ट व सोनी राजदान यांच्या लग्नाबद्दल, तसेच सावत्र बहि‍णींबद्दल वक्तव्य केले. तसेच तिने बॉबी देओलबरोबरच्या ब्रेकअपबद्दलही वक्तव्य केले.

या मुलाखतीत तिला विचारले की तिने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’मधील प्रमुख भूमिका का नाकारली? यावर पूजा म्हणाली, “डॅडी हा माझा पहिला सिनेमा होता. त्यानंतर अभिनेत्री म्हणून काम करण्याची माझी फारशी इच्छा नव्हती. माझा बॉयफ्रेंडही माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअरला फारसा पाठिंबा देत नव्हता.”

“आम्ही आमचे नाते कधीच…”

तो बॉयफ्रेंड बॉबी देओल होता का? असे विचारल्यानंतर पूजा भट्ट म्हणाली, “मी बॉबीला खूप उशिरा भेटले.” म्हणजे चित्रपटसृष्टीतील करिअरला पाठिंबा न देणारा बॉयफ्रेंड बॉबी देओल नव्हता, असे अभिनेत्रीने सांगितले. पुढे तिला विचारले की बॉबी देओल आणि तू रिलेशनशिपमध्ये होता का? त्यावर पूजा म्हणाली, “अर्थातच. तो प्रेमात पडण्यासारखाच होता.तो माझ्या आयुष्यातील एक जादुई काळ होता.”

बॉबी देओलबरोबर ब्रेकअप का झाले? यावर पूजा म्हणाली, “आज आमचे नाते का संपले किंवा आम्ही प्रेमात होतो, यावर बोलणे योग्य नाही, असे मला वाटते. ते नाते संपले आहे. आम्ही आमचे नाते कधीच नाकारले नाही. आज तो विवाहित आहे, मोठ्या मुलांचा बाप आहे आणि त्याच्या करिअरला एक नवीन गती मिळाली आहे. ‘ॲनिमल’मधील त्याची भूमिका मला खूप आवडला होती. माझ्यासाठी, त्यानेच तो चित्रपट गाजवला. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.”

पुढे ती म्हणाली की, मी त्या नात्याला क्षुल्लक मानणार नाही. मी एखाद्या व्यक्तीबरोबर घालवलेला वेळ हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या लोकांसाठीची प्रतिष्ठा राखणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असे म्हणत बॉबी देओलबरोबरच्या नात्यावर अधिक बोलण्याचे तिने टाळले.

बॉबीने १९९६ मध्ये तान्याशी लग्न केले. त्यांना आर्यमन देओल आणि धरम देओल ही दोन मुले आहेत. पूजाने २००३ मध्ये मनीष मखिजाशी लग्न केले. ११ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.