पूजा भट्ट ही महेश भट्ट व त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. पूजाने ‘डॅडी’ सिनेमातून बॉलीवूड पदार्पण केलं होतं, पण हा चित्रपट तिला लाँच करण्यासाठी बनवला नव्हता, असा खुलासा तिने केला आहे. पहिल्या चित्रपटानंतर आपल्याला अभिनय करायचा नाही, असा निर्णय पूजाने घेतला होता. त्यामुळेच तिने ‘आशिकी’ चित्रपटाची ऑफर नाकारली होती.
सायरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट्ट म्हणाली, “माझा पहिला चित्रपट मला लाँच करण्यासाठी बनवला नव्हता. माझे वडील महेश भट्ट मला म्हणाले होते की, त्यांच्याकडे एक कथा आहे, त्यात १७ वर्षांची मुलगी मुख्य भूमिकेत आहे. त्यावेळी माझं वयही १७ वर्षेच होतं. त्यामुळे या भूमिकेसाठी मी अगदी योग्य आहे, असं सांगत त्यांनी मला चित्रपट करणार का, असं विचारलं. त्यावर मी त्यांना विचार करण्यासाठी वेळ मागितला होता.”
पूजाने नकार दिल्यास ट्विंकल खन्नाला घेणार होते महेश भट्ट
चित्रपटसृष्टीत काम करणं सोपं नाही, याची जाणीव आपल्याला होती. त्यामुळे आर्किटेक्ट आणि अंतराळवीर व्हायचा विचारही केला होता, असं पूजा भट्टने सांगितलं. दरम्यान, पूजाला ‘डॅडी’ चित्रपट करण्याचा निर्णय घेण्यासाठी वडिलांनी २४ तास दिले होते. २४ तासांनी पुन्हा त्यांनी पूजाला विचारलं. तसेच तिला हा चित्रपट करायचा नसेल तर या भूमिकेसाठी ते डिंपल कपाडियांची मुलगी ट्विंकल खन्ना हिला विचारणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. हे ऐकताच पूजा भट्टने लगेच चित्रपट करण्यास होकार दिला. ती आठवण सांगत पूजा म्हणाली, “ते मला म्हणाले ‘तुला अभिनय करायचा नाही, पण ती भूमिका दुसऱ्या कुणाला मिळू नये असंही तुला वाटतं, याचा अर्थ तू याच इंडस्ट्रीसाठी बनली आहेस.’ यानंतर मी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.”
‘डॅडी’चं शूटिंग सुरू होण्यापूर्वीच महेश भट्ट यांनी पूजाला स्पष्ट सांगितलेलं की जर तिचा अभिनय चांगला नसेल, तर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात येईल. पूजा भट्टच्या मते, संवादफेक व सेटवर अभिनय करणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पूजा सेटवर चांगला अभिनय करू शकली नसती तर तिच्या वडिलांनी तिला चित्रपटातून काढून टाकलं असतं.
बॉयफ्रेंडमुळे नाकारला ‘आशिकी’
पूजा भट्टने पुढे सांगितलं की, ‘डॅडी’ चित्रपटानंतर तिला ‘आशिकी’मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली होती. तिचे काका मुकेश भट्ट तर सायनिंग अमाऊंट घेऊन तिच्या घरी पोहोचले होते, पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यावेळी पूजा एका रिलेशनशिपमध्ये होती. आपल्या बॉयफ्रेंडला आपण अभिनेत्री झालेलं आवडणार नाही, असं तिला वाटत होतं. म्हणूनच तिने स्वतःहूनच चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या बॉयफ्रेंडने कधीही तिला थेट अभिनय सोडण्यास सांगितलं नव्हतं, असंही तिने स्पष्ट केलं.
मुकेश भट्ट म्हणाले, “तुमची मुलगी वेडी झालीय…”
पूजाने ‘आशिकी’ चित्रपट नाकारल्यावर मुकेश भट्ट यांनी थेट महेश भट्ट यांना फोन केला आणि म्हणाले, “तुमची मुलगी वेडी झाली आहे, चित्रपटासाठी नकार देतेय.” त्यानंतर जेव्हा पूजा वडिलांशी बोलली तेव्हा ते इतके संतापले होते की काही वेळ फक्त त्यांच्या दीर्घ श्वासांचाच आवाज येत होता. “तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहेस,” असं महेश भट्ट संतापून म्हणाले होते.
इतकंच नाही तर महेश भट्ट पुढचे जवळपास दोन आठवडे पूजाशी एक शब्दही बोलले नव्हते. मात्र, नंतर जेव्हा पूजा ‘आशिकी’ चित्रपटाच्या सेटवर गेली, तेव्हा तिचं मत बदललं. त्यानंतर तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि आमिर खानबरोबर ‘दिल है कि मानता नहीं’ या गाजलेल्या चित्रपटात काम केलं.
