Pooja Bhatt On Mahesh Bhatt and Soni Razdan Marriage: महेश भट्ट हे बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माते आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे गाजले. आशिकी, दिल हैं कि मानता नहीं, सडक, हम है राही प्यार कें, जख्म असे अनेक सिनेमे गाजले.
महेश भट्ट हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिले, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिले. त्यांचे पहिले लग्न किरण भट्ट यांच्याशी झाले होते. त्यांना पूजा व राहुल भट्ट ही मुले आहेत, तर सोनी राजदान यांच्याशी महेश भट्ट यांनी दुसरे लग्न केले. त्यांना शाहिन भट्ट व आलिया भट्ट या मुली आहेत.
आता त्यांची मोठी मुलगी पूजा भट्टने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडील महेश भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, हे जाणून घेऊ…
“नात्याचा शेवट…”
पूजा भट्टने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. १९८६ ला महेश भट्ट व सोनी राजदान यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. मुलाखतीत पूजाला महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न करताना त्यांनी धर्म बदलला होता का, असे विचारले. त्यावर पूजा भट्ट म्हणाली, “ते माझ्या आईपासून कधीच वेगळे झाले नाहीत. मला माझ्या वडिलांची आणखी एक गोष्ट माहीत आहे. ती म्हणजे, एकदा जर त्यांनी तुमचा हात धरला तर तुम्ही कोणीही असा, ते तुमचा हात सोडत नाहीत, ते तुम्हाला त्यांच्या आय़ुष्यातून जाऊ देत नाहीत. हे सगळं त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांना लागू होतं, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना लागू होतं. ज्यांना शिकवले, ज्यांना घडवले त्यांच्या ते कायम बरोबर असतात.”
पूजा मुलाखतीत असेही म्हणाली, “वडिलांनी दुसरे लग्न केले, त्याचा आईला त्रास झाला. नात्याचा शेवट चांगला होत नाही. मी माझ्या आईचे दु:ख पाहिले आहे. मात्र, माझ्या आईने ते विभक्त झाल्यानंतर मला व माझ्या भावाला त्यांच्याविरुद्ध काहीही सांगितले नाही किंवा वडिलांनीदेखील आईबद्दल चुकीचे काही सांगितले नाही. असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा मी माझ्या आईशी भांडले आणि माझ्या वडिलांनी तिची बाजू घेतली.”
याच मुलाखतीत पूजाने सावत्र बहिणी आलिया व शाहिन यांच्याबरोबर खूप चांगले नाते असल्याचेदेखील सांगितले.
