Pooja Bhatt Talks About Soni Razdan : पूजा भट्ट ९०च्या काळातील बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम करत अनेक हिट चित्रपट दिले आहे. पूजा अनेकदा तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अशातच आता नुकतच तिने तिचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
पूजाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनी यांनी तिच्या आईचा (किरण भट्ट) आणि वडिलांचा संसार मोडला अशी भावना सोनी यांच्या मनात होती याबद्दल सांगितलं आहे. आलिया भट्टची आई सोनी यांनी महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचं किरण भट्ट यांच्याशी लग्न झालेलं आणि त्यांना पूजा भट्ट व राहुल भट्ट अशी दोन मुलं होती. पण, नंतर महेश भट्ट व सोनी राजदान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २० एप्रिल १९८६मध्ये लग्न केलं. परंतु, त्यावेळी सोनी राजदान यांच्या मनात त्यांच्यामुळे किरण आणि महेश यांचा संसार तुटला अशी अपराधी भावना होती असं सांगितलं आहे. पूजा नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.
सोनी राजदान नेमकं काय म्हणाल्या होत्या?
अलीकडेच पूजा भट्टने विकी ललवाणीला मुलाखत दिली. यावेळी तिने तिचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट तसंच सोनी राजदान यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे पूजाने सांगितले की, कूनूरमध्ये सोनी आणि तिने संवाद साधला होता. त्यांनी याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली होती. सोनी यांनी तिला सांगितलं की, “पूजा, मलाही खूप अपराधी वाटायचं.” त्यावर पूजा म्हणालेली, “मी तिला मनापासून सांगितलं की, एखादं नातं खरोखर मजबूत असेल तर तिसऱ्या व्यक्तीला त्यात जागाच मिळत नाही. नात्यात काहीतरी कमी किंवा तडे असतील तरच दुसऱ्या कुणाला त्या नात्यात येण्यासाठी जागा मिळते.” पूजाने हेही सांगितलं की, जगाला त्यांच्या नात्याबद्दल कळण्याच्या खूप आधीच महेश भट्ट यांनी तिला सोनीबद्दल सांगितलं होतं.
पूजा भट्ट म्हणाली, “खरं तर सोनीबद्दल मला माझ्या आईच्या आधीच माहिती होती. बाबांनी मला उठवून सांगितलं होतं की, मी एका महिलेला भेटलो आहे आणि आता मी घर सोडून जाणार आहे. पण याचा अर्थ मी तुझ्यावर कमी प्रेम करेन असा नाही. मी नेहमी तुझ्याबरोबर असेन.” यावेळी पूजा भट्टने मान्य केलं की, तिने तिच्या आईचं दुःख जवळून पाहिलं होतं. मात्र, तिचे आई-वडिलांनी नेहमीच एकमेकांशी आदराने आणि सभ्यपणाने वागले.
ती पुढे म्हणाली, “ते मला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? मला ही गोष्ट माझ्या वडिलांकडून किंवा आईकडून ऐकणं जास्त योग्य वाटलं, स्टारडस्ट, सिने ब्लिट्झ मासिकांमधून किंवा शेजाऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा.”
