Pooja Bhatt opens up about her life after divorce, quitting alcohol : मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या घटस्फोटानंतर एकटीने आयुष्य जगत आहेत. त्यांनी पुन्हा लग्न केलेलं नाही. यापैकीच एक म्हणजे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री पूजा भट्ट. २०१४ मध्ये घटस्फोटानंतर पूजा भट्टने एकटीने आयुष्य जगण्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं. 

पूजा भट्ट बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी नेहमी तिची मतं, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असते. पूजा भट्ट सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनेत्रीने एका मुलाखतीत घटस्फोट, लग्नानंतरचं तिचं आयुष्य आणि मद्यपान सोडल्यानंतर झालेला बदल याबद्दल सांगितलं आहे 

घटस्फोटाबद्दल काय म्हणालेली अभिनेत्री?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार पूजा भट्ट म्हणालेली, “हे खूप सुंदर आहे. मी एकटीने आयुष्य जगण्याचा आनंद घेत आहे. मी कदाचित १६ व्या वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. आता मी पक्ष्यासारखी मुक्त आहे. माझ्या आयुष्याची सूत्रं माझ्या हातात आहेत. निर्णय मी स्वतः घेते. माझ्याकडे जगाला देण्यासाठी खूप प्रेम आहे. माझे मित्र, मांजरी, पुस्तकं आणि माझं काम आहे. मी भटकंती करणारी आहे आणि खूप प्रवास करते. मला हवं तेव्हा बॅग उचलून निघता यावं, असं मला वाटतं. वयाच्या ५० व्या वर्षी मी जिम सुरू केलं. आता माझ्यासाठी जिम हेच मंदिर आहे.”

पूजाने प्रेमाबद्दलचा तिचा दृष्टिकोन नकारात्मक नसल्याचंही म्हटलं आहे. पूजा भट्टने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “मी नेहमी प्रेमाचा सन्मान करणारी व्यक्ती राहीन. माझ्या मित्रपरिवारात काही जण ४० वर्षांपासून विवाहित आहेत, तर काही जण चार वेळा घटस्फोट घेतलेले आहेत. मला काहीच कमी वाटत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला स्वत:मध्ये पूर्ण असल्यासारखं वाटतंय. योग्य व्यक्ती शोधणं हेच सगळं नसतं, तर स्वतः योग्य व्यक्ती बनणंही तितकंच महत्त्वाचं असतं, हे समजायला मला खूप वेळ लागला.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी साडेआठ वर्षांपूर्वी मद्यपान करणं बंद केलं. दारू सोडणं सोपं होतं पण, ते सोडल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींपासून पळत होतो, हे समजतं. दारू वेदनेवरचा उपाय म्हणून वापरलं जात होतं. प्रेमाचंही काहीसं असंच असतं.”