१९७० च्या दशकात ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट हे आध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचे अनुयायी बनले होते. ते नियमितपणे पुण्यातील ओशोंच्या आश्रमात जात असत. मात्र, काही काळानंतर त्यांनी ओशोंची साथ सोडली. त्यानंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. पुढे महेश भट्ट यांना ‘अँटी-गुरू’ यू. जी. कृष्णमूर्ती यांच्या रूपाने नवा आध्यात्मिक मार्गदर्शक मिळाला. महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्टने नुकत्याच एका मुलाखतीत वडिलांनी ओशोंचा आश्रम सोडला, त्या काळातील अस्थिर आणि भावनिक प्रसंगांची आठवण सांगितली आहे.

पूजा भट्टने यावेळी तीसुद्धा लहान असताना ओशोंच्या आश्र्मात गेलेली आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घेतले होते अशी आठवण सांगितली यावेळी तिने तिच्या वडिलांचे ओशोंबरोबर वाद झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचा प्रसंगही सांगितला आहे.

महेश भट्ट यांनी टॉयलेटमध्ये टाकलेली ओशोंची माळा

वडील महेश भट्ट आणि ओशो यांच्यामधील वादाबद्दल पूजा म्हणाली, “माझे वडील रजनीश (ओशो) यांच्या अनुयायांपैकी एक होते. एक दिवस त्यांनी गळ्यातील माळ काढून ती थेट टॉयलेटमध्ये फ्लश करून दिली.” ती पुढे म्हणाली, “त्यानंतर त्यांच्यावर आश्रमात येण्यास बंदी घालण्यात आली. मला आठवतं, विनोद खन्ना यांच्या माध्यमातून माझ्या आईला मॅसेज आला होता की, भगवान (ओशो) खूप रागावले आहेत. ते महेश यांचा नाश करतील. मी लहान असताना एका रात्री आम्हाला घाईघाईने पुण्यातील एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं.”

पूजा भट्टने पुढे ओशोंचं वर्णन करत त्यांना “नकार मिळालेल्या प्रियकरासारखं” असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, “लोकांनी त्यांना सोडून जाणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. मा शीलांच्या बाबतीतही असंच झालं. शेवटी प्रश्न हा असतो की, मला तुम्ही नेहमीच सर्वोच्च स्थानावर का ठेवू शकत नाही? मग ती व्यक्ती धर्मगुरू असो किंवा राजकारणी, प्रत्येकालाच लोकांनी आपली पूजा करावी, अशी अपेक्षा असते.” पूजा भट्टने हे वक्तव्य ‘सायरस सेज’ या पॉडकास्टमध्ये केलं. मा शीला या ओशोंच्या अनेक वर्षे विश्वासू सचिव म्हणून कार्यरत होत्या.

या कारणामुळे ओशोंचे अनुयायी झाले होते महेश भट्ट

काही वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी ते ओशोंचे अनुयायी कसे झाले, याबद्दलही खुलासा केला होता. ‘मंजिलें और भी हैं’ (१९७४) आणि ‘विश्वासघात’ (१९७७) हे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं. अरबाज खानच्या चॅट शोमध्ये महेश भट्ट म्हणालेले, “माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मी आध्यात्माच्या शोधात निघालो. त्यावेळी मी पुण्यातील करिष्माई गुरू ओशो रजनीश यांच्याकडे गेलो आणि स्वतःला पूर्णपणे त्यांच्या विचारांना समर्पित केलं. भगवे वस्त्र परिधान करायचो आणि दिवसातून पाच वेळा ध्यानधारणा करत होतो.”

गळ्यातील माळ टॉयलेटमध्ये फ्लश करण्यामागचं कारण सांगताना महेश भट्ट म्हणाले, “माझ्या मनात अजूनही मत्सर आणि इतर नकारात्मक भावना होत्या, पण वरवर मी चांगलं बोलत होतो. त्यामुळे मला स्वतःच ढोंगी असल्यासारखं वाटू लागलं. मी स्वतःशी आणि जगाशी खोटं बोलू शकत नव्हतो.” ते पुढे म्हणाले, “हे सगळं निरर्थक आहे. मीच मूर्ख ठरलो, असं मी अभिनेते विनोद खन्ना यांना सांगितलं होतं.” महेश भट्ट यांनीच विनोद खन्ना यांची ओशोंशी ओळख करून दिली होती.

ते म्हणाले, “मी ओशोंपासून दूर झालो, पण विनोद तिथेच राहिला. त्यानंतर तो अमेरिकेतील ओरेगॉनमधील आश्रमात गेला. त्याला परत आणण्यासाठी मी एकदा अमेरिकेलाही गेलो होतो. मात्र, तो पूर्णपणे रमला होता.” १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला करिअरच्या शिखरावर असतानाच विनोद खन्ना यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि अमेरिकेतील ओरेगॉन येथील ओशो आश्रमात वास्तव्यास गेले. काही वर्षांनंतर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं.