Pooja Dadwal Bollywood Struggle: बॉलीवूडमध्ये झगमगाटामागे अनेकदा संघर्षाची मोठी काळी बाजू दडलेली असते. ‘वीरगती’ फेम पूजा डडवालची गोष्ट ही याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. अवघ्या १६ व्या वर्षी सलमान खानची नायिका बनून करिअरची सुरुवात करणाऱ्या पूजाने इंडस्ट्रीत नाव कमावले होते. मात्र, काळाच्या ओघात फुफ्फुसांचा आजार आणि ‘टीबी’मुळे तिची प्रकृती खालावली. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाने साथ सोडली असताना सलमान खानच्या ‘बीइंग ह्युमन’ फाऊंडेशनने तिला उपचारांसाठी मदत केली. मृत्यूच्या दाढेतून परतलेली पूजा आज पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असून सध्या ती टिफिन सर्व्हिस चालवून आपला उदरनिर्वाह करत आहे.
पूजा डडवालने १९९५ मध्ये आलेल्या ‘वीरगती’ या चित्रपटातून अवघ्या १६ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तेव्हाची आठवण सांगताना पूजाने सांगितलं की तिला पहिला मोठा ब्रेक मिळाल्यावर तिने अभिनयाचे क्लास सुरू केले होते. सलमान खानबरोबर काम करणं एका किशोरवयीन मुलीसाठी हे एखाद्या स्वप्नासारखं होतं. “तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता,” असं ती म्हणाली. पण हे सगळं फार काळ टिकलं नाही.
गाजलेल्या मालिकांमध्ये पूजा डडवालने केलं काम
चित्रपटसृष्टीत स्वतःचा सिद्ध करण्यापूर्वीच पूजा छोट्या पडद्याकडे वळली. तिने अनेक टीव्ही मालिकांत काम केलं. २००१ मध्ये झी टीव्हीवरील ‘घराना’ ही तिची शेवटची मोठी मालिका होती. अमन वर्मा आणि सुचेता खन्ना यांसारख्या कलाकारांबरोबर काम करून तिला ओळख आणि नवीन संधीही मिळाल्या. तिला वाटलं की करिअर योग्य दिशेने जातंय, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.
या काळात तिची भेट राजेंद्र सिंहला भेटली. त्याने कठीण काळात तिला साथ दिली. करिअरमध्ये स्थिरावत असताना तिची प्रकृती बिघडू लागली. पण हे फक्त आजारपण नव्हतं, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठं संकट होतं. “लोक अनेक स्वप्ने पाहतात आणि अचानक फक्त आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना एखाद्या किड्यासारखं फेकून दिलं जातं,” असं ती बीबीसीशी बोलताना म्हणाली होती.

गोव्यात नोकरी, प्रकती खालावली अन् फुफ्फुस निकामी झाले
पूजा डडवालला इंडस्ट्रीत काम मिळत नव्हतं, त्यामुळे तिने गोव्यातील एका कॅसिनोमध्ये नोकरी सुरू केली होती. यादरम्यान तिची प्रकृती इतकी खालावली की तिचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाले. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, भूक लागेनाशी झाली आणि दिवसेंदिवस ती अशक्त होत गेली. अशा कठीण काळात, जेव्हा तिला आधाराची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला वाऱ्यावर सोडलं. अशा वेळी राजेंद्र तिच्या मदतीला धावून आला. त्यांनी तिला मुंबईला नेलं, तिच्यावर उपचार केले आणि तिला साथ दिली. तपासणीनंतर तिला ‘टीबी’ (क्षयरोग) झाल्याचं निदान झालं.
सलमान खानने केलेली पूजा डडवालला मदत
२०१८ मध्ये पूजाचा एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला. तिने तिचा जुना सहकलाकार सलमान खानला उद्देशून हा व्हिडीओ केला होता. यात तिने सलमानकडे पैसे नाही, तर फक्त उपचारांसाठी मदत मागितली होती. त्यानंतर सलमान खानच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) फाऊंडेशनने पुढाकार घेतला, तिच्या उपचारांचा सर्व खर्च उचलला आणि तिला बरं होण्यासाठी पूर्ण मदत केली होती. ‘मुंबई मिरर’शी त्याबद्दल बोलताना पूजाने सांगितलं होतं की, हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये पडून असताना तिने जगण्याची आशा जवळपास सोडली होती. तिच्या आजूबाजूला असे रुग्ण एकाकी आणि हताश अवस्थेत मृत्यूमुखी पडताना ती पाहत होती. पण तिने लढायचं ठरवलं आणि ती यातून बाहेर आली. तिच्याबद्दल समजल्यावर अनेकांनी तिला फोन केले. पण काम कुणीच दिलं नाही. काहींनी तर चुकीच्या हेतूने तिला फोन केले, तिला हतबल समजून तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. “मला पैसे नको आहेत, मला फक्त कामाची गरज आहे,” असं तिने ‘न्यूज नेशन’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
टिफिन सर्व्हिस चालवते पूजा डडवाल
आज पूजा डडवाल एका छोट्या १०×१० च्या खोलीत राहते आणि उदरनिर्वाह करण्यासाठी टिफिन सर्व्हिस चालवते. घरगुती जेवण बनवून ती पैसे कमावते. इतकी संकटं येऊनही तिचा स्वतःवरचा विश्वास डगमगलेला नाही. ती म्हणते, “मी कधीही चुकीचा रस्ता निवडला नाही आणि कधी निवडणारही नाही.”
खरं तर ज्या पूजाने आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या करिअरमधून २० वर्षांचा मोठा ब्रेक घेतला होता, तिलाच तिची आर्थिक स्थिती खालावल्यावर त्याच कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं. “त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून दूर का केलं, हे मला आजही माहित नाही,” असं ती खिन्नपणे सांगते. “मी आता बरी आहे. मी फक्त याची वाट पाहत आहे की, कोणीतरी मला पुन्हा फोन करेल आणि अभिनयाची आणखी एक संधी देईल,” असं पूजा डडवाल म्हणते. खरं पूजा डडवालची ही गोष्ट फक्त एका अभिनेत्रीच्या यशाची आणि अपयशाची नाही, तर या इंडस्ट्रीतील क्षणभंगुर लोकप्रियतेची आहे. असे अनेक कलाकार इंडस्ट्रीपासून दूर गेल्यावर हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत.
