दिवंगत शेफाली जरीवालाची मैत्रीण पूजा घई हिने अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर काय घडलं? ते सांगितलं. शुक्रवारी, २७ जून रोजी ४२ व्या वर्षी शेफालीचे निधन झाले. शेफालीचा पती पराग त्यागी पाळीव श्वानाला फिरवण्यासाठी खाली गेला होता, तेव्हा मदतनीसने त्याला फोन करून शेफालीला बरं नसल्याचं सांगितलं. तो वर गेला आणि तिला रुग्णालयात घेऊन गेला, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
शेफालीच्या निधनाबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस चौकशीसाठी घरी आले. पूजा म्हणाली, “दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परागची चौकशी केली. शवविच्छेदनात तिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झालेला नाही, तिच्याबरोबर कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं आढळलं. शवविच्छेदन अहवालातील इतर बाबी अजून अधिकृतपणे समोर आलेल्या नाहीत.”
विकी लालवानीने मुलाखतीत पूजाला शेफालीच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षांबद्दल विचारलं. पूजा म्हणाली, “शेफालीबरोबर कोणताही गैरप्रकार झाला नाही. जेव्हा मी परागला पाहिलं तेव्हा मला फक्त एकच भीती वाटत होती… तो खूप दुःखी होता, त्याला एकटं राहावं वाटत होतं, पण पोलिसांकडून त्याची उलटतपासणी केली जात होती. अर्थात, ते त्यांचं काम करत होते. मी नावं घेणार नाही पण आधीच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये तुम्ही असं पाहिलं आहे. पोलीस जवळच्या नातेवाईकांची अनेक महिने चौकशी करतात. बऱ्याच जणांचं आयुष्य संपतं. त्यांना आपली जवळची व्यक्ती गेल्याचा शोकही व्यक्त करता येत नाही, कारण ते सतत पोलिसांच्या रडारवर असतात. ज्या क्षणी मी परागला पाहिले, तेव्हा मला इतकंच वाटलं की ‘त्याने लवकरात लवकर यातून बाहेर पडावं’. सुदैवाने, रिपोर्टमध्ये शेफालीबरोबर काहीही गैरप्रकार झाला नाही, असं सांगण्यात आलं आणि परागची चौकशी थांबली. “
शेफालीच्या आईला रुग्णालयात न्यावं लागलं, तर पराग…
पूजाने सांगितलं की शेफाली तिच्या आरोग्याबद्दल आणि दिसण्याबद्दल खूप काळजी घ्यायची. निधनाच्या दिवशी तिने व्हिटॅमिन सी सलाईन लावलं होतं. शेफाली नियमितपणे सप्लिमेंट्स घ्यायची असंही पूजाने नमूद केलं. “शेफाली काय खावं आणि काय करावं याबद्दल खूप जागरूक होती. ती तिच्या खाण्यापिण्याबद्दल खूप काळजी घ्यायची,” असं पूजा म्हणाली. दुसऱ्या दिवशी शेफालीची आई आणि परागची भावनिक अवस्था काय होती असे विचारल्यावर पूजाने सांगितलं की शेफालीच्या आईला रुग्णालयात न्यावं लागलं होतं, तर पराग पूर्णपणे सुन्न झाला होता.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शेफालीने निधनाच्या सकाळी तरुण दिसण्यासाठीची औषधं घेतली होती, ज्यामुळे तिच्या रक्तदाबावर परिणाम झाला असावा. “प्राथमिक तपासानुसार, शेफालीच्या मृत्यू प्रकरणात कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही आणि मृत्यूच्या कारणाबद्दल डॉक्टरांनी त्यांचं मत अद्याप सांगितलेलं नाही,” असं झोन ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम म्हणाले.