ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’च्या (CINTAA) अध्यक्षा पूनम ढिल्लो यांनी ‘डॉन ३’ च्या वादात अभिनेता रणवीर सिंह याला पाठिंबा दिला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित करत असलेल्या ‘डॉन ३’ या चित्रपटातून रणवीरने माघार घेतली. त्यामुळे एका चित्रपट संघटनेने त्याच्यावर बंदी घातली होती. ही बंदी विचित्र असल्याचं वक्तव्य पूनम यांनी केलं. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने रणवीरवर काही आठवड्यापूर्वी बंदी घातली. त्याविरोधात रणवीरने ‘सिंटा’कडे यायला हवं होतं, असं पूनम ढिल्लो म्हणाल्या. ‘डॉन ३’ संदर्भात रणवीर फरहान व रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ या प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चा करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करतोय, याबद्दल पूनम यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
अनेकजण तर नुकसानभरपाईसुद्धा देत नाहीत – पूनम ढिल्लो
फ्री प्रेस जर्नलशी बोलताना पूनम ढिल्लो म्हणाल्या, “मला पूर्ण खात्री आहे की रणवीर एक समजूतदार आणि चांगला माणूस आहे. तो कोणाचेही जाणूनबुजून नुकसान करणारा किंवा कोणाला दुखावणारा व्यक्ती नक्कीच नाही. त्याचे एक्सेल एंटरटेनमेंटबरोबर खूप चांगले संबंध आहेत. त्याने त्यांच्याबरोबर दोन मोठे हिट चित्रपट (दिल धडकने दो आणि गल्ली बॉय) दिले आहेत.”
“त्यामुळे जर काही कारणांमुळे रणवीर हा चित्रपट करण्यात कम्फर्टेबल नसेल, तरी त्याने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची तयारी दाखवली आणि घेतलेली सायनिंग अमाउंट देखील परत केली. अनेक लोक तर एवढंही करत नाहीत,” असं पूनम पुढे म्हणाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने एक्सेल एंटरटेनमेंटला १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची ऑफर दिली होती, जी त्यांनी स्वीकारली नाही. कारण रणवीरने चित्रपट सोडण्यापूर्वी ‘डॉन ३’ च्या प्री-प्रोडक्शनवर झालेला ४५ कोटी रुपयांचा खर्च त्याने द्यावा, अशी त्यांची मागणी होती.
रणवीर सिंगला आमची गरज नाही – पूनम ढिल्लो
विविध कारणांमुळे कलाकारांनी अगदी शेवटच्या क्षणी चित्रपट सोडणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, इतर लहान कलाकारांच्या तुलनेत रणवीर आधीच एक मोठा स्टार आहे आणि त्याच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्याला ‘सिंटा’च्या (CINTAA) मदतीची तितकीशी गरज नाही, असं पूनम म्हणाल्या. “रणवीर स्वतः खूप सक्षम आहे. तो कायदेशीर सल्ला घेण्यासाठी खर्च करू शकतो.”
चित्रपट आवडला नाही तर कलाकारांवरच होते टीका – पूनम ढिल्लो
रणवीरला चित्रपटाची कथा आवडली नसेल आणि त्यामुळे तो ‘डॉन ३’ मधून बाहेर पडला असेल, तर या निर्णयाचंही पूनम ढिल्लो यांनी समर्थन केलं. “पटकथेबाबत मत मांडण्याचा अधिकार कलाकारांना असतो, कारण पडद्यावर तेच मुख्य चेहरे म्हणून दिसणार असतात. शेवटी जर चित्रपट लोकांना आवडला नाही, तर कलाकारांवरच टीका होते. त्यामुळेच आजकालचे कलाकार चित्रपटाच्या भल्यासाठी काही बाबतीत सहभागी होतात, माझ्या मते ते योग्यच आहे,” असं पूनम ढिल्लो म्हणाल्या.
पूनम ढिल्लो यांनी कलाकारांना एक सल्लाही दिला. पूनम म्हणाल्या, “मला वाटतं की चित्रपट सोडण्यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचाय, तो सुरुवातीच्या टप्प्यातच घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की, मैत्रीपोटी कलाकार एखादा चित्रपट स्वीकारतात. पण पुढे जाऊन त्यातून काय असेल हे माहित नसतं. चित्रपटाच्या डिटेल्स, पटकथा हे माहित नसतं. पुढे याच गोष्टींमुळे समस्या येतात. कारण तुम्ही नैतिकदृष्ट्या तर प्रोजेक्टसाठी तयार असता, पण भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या तुम्हाला जाणवतं की तुम्ही या चित्रपटात काम करायला कम्फर्टेबल नाहीत.”
FWICE च्या बंदीबद्दल पूनम ढिल्लोंची प्रतिक्रिया
‘सिंटा’ (CINTAA) संघटनेशी कोणतीही चर्चा न करता रणवीरवर थेट अशी कठोर बंदी घालणाऱ्या FWICE या संघटनेवर पूनम यांनी टीका केली. “जेव्हा आमच्या कलाकारांवर अन्याय होतो, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी लढतो. आमच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता. कोण्या तिसऱ्याच पक्षाने मध्ये येऊन युद्ध पुकारल्यासारखं हे सगळं झालं. त्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आणि मला वाटतं की यामुळे परिस्थिती आणखीच बिघडली,” असं पूनम ढिल्लो म्हणाल्या.
“या प्रकरणात निर्माते आणि कलाकार, जे एकमेकांचे मित्रही आहेत यांच्यात या मुद्द्यावर चर्चा झाली असेल, वाटाघाटी झाल्या असतील आणि हा वाद सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला गेला असेल. हा वाद आता मिटला आहे, याचा मला खूप आनंद आहे,” असं पूनम ढिल्लो म्हणाल्या. दरम्यान, ‘सिंटा’च्या सरचिटणीस उपासना सिंह यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करून रणवीरविरुद्धचा हा बंदीचा आदेश मागे घेण्याची विनंती ‘FWICE ‘कडे केली आहे.
