Poonam Pandey Instagram Post : ‘कॉन्ट्रव्हर्सी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचे कारण म्हणजे तिने नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट. तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा होत आहेत.
३१ मार्च रोजी पूनमने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत आपण गरोदर असल्याचे जाहीर केले. या फोटोंमध्ये ती आपला बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये गरोदर महिला आणि लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीचे इमोजीसुद्धा वापरले आहेत. मात्र, पूनमच्या या घोषणेवर नेटकऱ्यांचा विश्वास बसताना दिसत नाहीये.
पूनमचा हा नवा स्टंट तर नाही ना… याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तशा अनेक प्रतिक्रियासुद्धा नेटकऱ्यांनी फोटोखालील कमेंट्समध्ये व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हे फोटो ‘एआय’ (AI)निर्मित असल्याचा संशय व्यक्त केला आहे; तर काहींनी उद्या १ एप्रिल असल्याने हा ‘एप्रिल फूल’चा प्रकार असावा, असे म्हटले आहे. मराठी अभिनेता पुष्कर जोगनेदेखील “खरंच?” अशी कमेंट केली आहे.
पूनमच्या या बातमीवर लोक इतक्या सहज विश्वास का ठेवत नाहीत, यामागे एक मोठे कारण आहे. २०२४ मध्ये पूनमच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Cervical Cancer) मरण पावल्याची खोटी बातमी पसरवली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी पूनमने समोर येत हा केवळ जनजागृतीसाठी केलेला एक ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे सांगितले होते. या प्रकारामुळे तिच्यावर प्रचंड टीका झाली होती आणि मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच आताच्या गरोदरपणाच्या बातमीवरही नेटकऱ्यांचा विश्वास बसत नाहीय
पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो
पूनमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, News18 च्या वृत्तानुसार २०२० मध्ये तिने सॅम बॉम्बेबरोबर लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिने पतीवर मारहाण आणि छळ केल्याचे गंभीर आरोप केले होते. गोव्यात शूटिंगदरम्यान घडलेल्या या प्रसंगानंतर सॅमला अटकही झाली होती. त्यानंतर हे दोघे वेगळे झाले. पूनमने हे चार वर्षांचे नाते अत्यंत त्रासदायक असल्याचे सांगत घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.
पूनम पांडेच्या फोटोंवर पुष्कर जोगची कमेंट

पूनमच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ती शेवटची कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर ती कायमच सक्रिय असते. ती अनेक बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. अशातच आता तिने शेअर केलेले नवीन फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यामुळे पूनम खरोखरच आनंदाची बातमी देणार आहे की पुन्हा एकदा तिने एखादा ‘पब्लिसिटी स्टंट’ केला आहे, हे लवकरच समोर येईल.
